Home /News /maharashtra /

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हुसेन दलवाई यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हुसेन दलवाई यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्य न्यायमंत्री तसंच माजी राज्यसभा खासदार ज्येष्ठ समाजवादी नेते हुसेन मिस्त्रिखान दलवाई यांचं निधन झालं

चिपळूण, 16 मे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्य न्यायमंत्री तसंच माजी राज्यसभा खासदार ज्येष्ठ समाजवादी नेते हुसेन मिस्त्रिखान दलवाई यांचं निधन झालं आहे. ते 99 वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हुसेन दलवाई यांच्या निधनामुळे काँग्रेसच्या गोटातून शोक व्यक्त केला जात आहे. हुसेन दलवाई हे चिपळूण शहरातील मिरजोळी गावचे रहिवाली होते. चिपळूणमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर मुंबईत त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते काही काळ मुंबई हायकोर्टात वकिली देखील केली होती. त्यानंतर त्यांनी खेडमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. खेड तालुक्यातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती, या निवडणुकीत ते विजयी झाले होते. काँग्रेसकडून त्यांना दोन वेळा राज्यसभेची खासदारकी मिळाली होती. तसंच त्यांनी काँग्रेसकडून राज्यमंत्रिपदही भुषवलं होतं. अस्खलित मराठी बोलणारे, संस्कृत, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर विद्वत्तापूर्ण प्रभूत्त्व असणारे दलवाई हे पहाता क्षणी त्यांच्याबद्दल आदर निर्माण होईल असे व्यक्तिमत्त्व होते. ते अत्यंत उत्साहाने आणि प्रसन्न चेहऱ्याने सामान्य माणसांच्या भेटीगाठी घेत असत. गेली सुमारे वीसबावीस वर्षे ते राजकारणापासून दूर होते. पण राजकारणी माणसांशी असलेले त्यांचे संबंध आजपर्यंत कायम होते. ते कट्टर काँग्रेसवासी होते, तरीही विरोधी पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेऊन असत. त्यांचा उल्लेख सिनियर असा केला जातो. कारण पत्रकारिता आणि राजकारणातील आताच्या पिढीला माहित आहेत ते दुसरे हुसेन दलवाई. त्यांना ज्युनियर हुसेन दलवाई असे म्हटले जाते. हुसेन मिस्त्रिखान दलवाई (सिनियर) हे खेड विधानसभा मतदार संघातून विधानसभेवर  १९६२पासून निवडून येत. जन्म व शिक्षण चिपळूणमध्ये, वकिली मुंबईत आणि आमदारकी खेडमध्ये असे त्रिस्थळी असलेले दलवाईसाहेब चिपळूण ही आपली आई आहे आणि खेड ही मावशी आहे असं सांगत व दोन्ही तालुक्यातील सामान्य कार्यकर्त्यांशी जिव्हाळयाचं नातं ठेवीत. खेड आणि चिपळूणच्या दरम्यान आज जी लोटे-परशुराम ही औद्योगिक वसाहत दिसते, ती दलवाई यांनी राज्याचे तत्कालीन कामगार मंत्री नरेंद्र तिडके यांच्याकडे हट्ट धरून मंजूर करून घेतलेली आहे. आज खेड तालुका पाण्याने समृध्द आहे. त्याला कारणीभूत ठरलेला नातूनगरचा जलप्रकल्प दलवाईसाहेबांनीच मंजूर करून घेतला आणि तालुक्याचा बराच भाग सुजलाम झाला. खेड तालुक्यात आज असलेली मध्यम व लघु धरणे दलवाई यांच्याच काळात झालेली किंवा त्यांनी आखणी केलेली आहेत. सुदैवाने त्यानंतर आमदार झालेले कै. तु.बा.कदम यांनी तेवढ्याच तळमळीने धरणांची अपुरी पूर्ण करून घेतली. आणीबाणीच्या काळात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या विरोधात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. यशवंतराव चव्हाण, कै. वसंतदादा पाटील यांच्या पुढाकाराने मोठा उठाव झाला. त्यासाठीच्या सर्व बैठका दलवाईसाहेबांच्या मुंबईतील ओव्हल मैदानासमोरच्या एम्प्रेस कोर्ट या निवासस्थानी होत.  शरद पवार यांच्यासह कॉंग्रेसचे सर्व नेते तेथे एकत्र येत. त्यानंतरच्या काळात शंकररावांच्या जागी वसंतदादा पाटील यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात दलवाई यांना मंत्री केले. त्यानंतर बॅ.अ.र.अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्याचेही विभाजन झाले. त्यावेळी दलवाईसाहेब राज्यसभेवर निवडून गेले व नंतर स्वेच्छेने निवृत्त झाले. काही काळासाठी दलवाई यांनी महाराष्ट्राच्या अल्पसंख्य आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. तेथेही कार्यकर्त्यांची सदैव वर्दळ असे. त्याच सुमारास ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यरत झाले. रोज सकाळी तीन तास ते प्रतिष्ठानमध्ये काम करीत असत. दलवाई यांच्या वडिलांनी चिपळूण नगरपालिकेतील एका पोटनिवडणुकीत विजय मिळवून समाजसेवेची सुरुवात केली. दलवाईसाहेबांनी ते काम पुढे अखंडपणे करीत नेले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या