सातारा, 15 नोव्हेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यात खूनाच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. यातच आता क्षुल्लक कारणावरुन पत्नी आणि मुलाकडून त्याच्या वडिलांचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने साताऱ्यात खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
किसन नारायण सावंत (वय 50, रा. दिवड, ता. माण, जि. सातारा) असे खून झालेल्याचे नाव आहे. घरात सुरू असलेला टीव्ही बंद केल्याच्या कारणावरून पत्नी व मुलाने वडिलांना कळकाच्या काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा खून केला. ही घटना माण तालुक्यातील दिवड येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, माण तालुक्यातील दिवड येथे किसन नारायण सावंत आपल्या कुटुंबासह राहत होते. 1 नोव्हेंबरला दुपारी अडीचच्या सुमारास किसन सावंत हे बाहेरून घरी आले. याचवेळी त्यांचा मुलगा आणि बायको हे मोबाइल पाहत होते. याचवेळी घरातील टीव्हीसुद्धा तसाच चालू होता. पत्नी आणि मुलगा मोबाईलवर होते. आणि टीव्ही सुरू होता. पण कुणी पाहत नसल्याने त्यांनी तो बंद केला.
हेही वाचा - गळफास लागून मृत्यू, पोस्टमॉर्टमनंतर समोर आलं कांड, बीडच्या घटनेने खळबळ
मात्र, यानंतर धक्कादायक घटना घडली. टीव्ही का बंद केला म्हणून पत्नी उषा किसन सावंत, मोठा मुलगा आदित्य किसन सावंत या दोघांनी आपापसात संगनमत करून घरातील कळकाची दांडकी घेतली आणि त्यांच्या डोक्यात मारली. इतकेच नव्हे तर संपूर्ण अंगावर तसेच त्यांच्या छातीवर, पोटावर लाथाबुक्क्यांनी त्यांनी जबर मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले.
या धक्कादायक प्रकारानंतर त्यांना नातेवाईकांनी आधी पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना ससून हॉस्पिटल पुणे येथे दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचार सुरू असतानाच शनिवारी 12 नोव्हेंबरला त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Satara