सचिन जाधव, प्रतिनिधी सातारा, 11 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार स्वतः उपस्थित होते. मात्र, त्यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा माध्यमांत रंगू लागल्या आहेत. यावर स्वतः अजित पवार यांनीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मला फक्त महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे. माझ्यावर राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे. यापूर्वीही कोणतंही पद नसताना मी आमदार निवडीचं काम करत होतो आता कोणी मला थांबवणार आहे का? असंही ते म्हणाले. अजित पवार साताऱ्या दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. काय म्हणाले अजित पवार? नविन लोकं येत असतात, जुनी जात असतात. अनेक नेते पवार साहेबांना सोडुन गेले. म्हणुन पक्ष थांबला नाही. नवीन कोणं आलं आणि जागा भरुन काढली ही सततची प्रोसेस सुरु असते. कोणाचच कोणावाचुन नडत नसते. सातारा खासदारकीसाठी आमच्याकडं नावं समोर आली आहेत. मात्र, जागा वाटप झालं नसल्यामुळं आत्ता नावं सांगणे उचित नाही. साताऱ्यात महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडुन येईल. मला केंद्राच्या राजकारणात रस नाही : अजित पवार मला केंद्राच्या राजकारणात रस नाही. माझ्या कामाची पद्धत आणि राष्ट्रीय कामाच्या पातळीची पद्धत वेगळी आहे. भाकरी फिरवली हे मीडियानं सांगितलं. पवार साहेबांनी याला दुजोरा दिला नाही. देवेंद्र फडणवीसांनी काय म्हणावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांच्या बोलण्याला जास्त महत्व दिलं पाहिजे. असं मला वाटत नाही. पक्षाची स्थापना झाल्यापासुन कोणतीच निवडणुकीची जबाबदारी माझ्यावर नव्हती तरी मी आमदार निवडण्याचं काम करत होतो. आत्ता मला कोण थांबवणार आहे? मला नाराज व्हायचं नाही तरी तुम्ही मला नाराज व्हायला भाग का पाडताय? असा उलटप्रश्न अजित पवार यांनी माध्यमाला विचारला. वाचा - Solapur News : सोलापुरात भाजप-शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; शिंदे गटाचा इशारा विरोधक आणि आम्ही एकमेकांचे दुष्मन नाही. अजुन एक वर्षात आमदारांचं निलंबन झालं नाही. यापुढंचं सुद्धा एक वर्ष कसं निघुन जाईल कळणार सुद्धा नाही. 16 आमदारांच्या निलंबनाचा चेंडु आता सभापतींच्या कोर्टात आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचं महाराष्ट्रात काहीच कारण नाही. हे उदात्तीकरण कोण करतं याच्या खोलात जावुन तपास केला पाहिजे. आमच्या तीन पक्षांच्या सरकारच्या काळात अशा घटना घडत नव्हत्या, असंही पवार यावेळी म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.