सातारा, 13 ऑक्टोबर : सातारा जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र प्रशासनातील एक बडा अधिकारी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी या अधिकाऱ्याचा शोध घेतला असता हा अधिकारी नीरा नदीच्या पुलावरुन पायी जात असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. संबंधित अधिकारी हे राज्याच्या पणन विभागाचे सहसंचालक आहेत. शशिकांत घोरपडे असं त्यांचं नाव आहे. शशिकांत हे मूळचे साताऱ्याचे आहेत. पण ते सध्या पुण्यातील कार्यालयात कार्यरत आहेत. ते बुधवारी दुपारी पुण्याहून साताऱ्याच्या मार्गाला निघाले होते. पण ते साताऱ्याच्या त्यांच्या घरी पोहोचलेच नसल्याची माहिती समोर आली. त्यांच्या कुटुंबियांनी बराच वेळ झाला तरी शशिकांत घरी आले नाही म्हणून पोलिसात तक्रार केली त्यानंतर पोलिसांच्या तपासाचे चक्र फिरले. पण शशिकांत घोरपडे हे अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी नीरा नदीच्या पात्रात बचाव पथक दाखल झाले आहे. एनडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी पाचरण करण्यात आलं आहे. शशिकांत यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता झाल्याची धक्कादाक माहिती समोर आली आहे. ते काल पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात होते. या दरम्यान त्यांनी सारोळ गावाजवळ गाडी पार्क केली. तिथून पुढे ते निरा नदीच्या दिशेला चालत गेले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे स्पष्ट झालंय. त्यामुळे त्यांनी नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केली असावी, अशी शंका वर्तवली जात आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यावर प्रशासनाची टीम दाखल झाली आहे. नदीपात्रात शशिकांत यांचा शोध घेतला जातोय. ( ‘भुजबळ आज शिवसेनेत असते तर…’, पवारांसमोरच ठाकरे नेमकं काय बोलून गेले? ) शशिकांत घोरपडे बुधवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ते त्यांच्या पुण्यातील कार्यालयात पणन संचनालयात होते. साडेतीन वाजेनंतर ते पुण्याहून त्यांच्या मित्राची कार घेवून साताऱ्याच्या दिशेला निघाले होते. शशिकांत हे मूळचे साताऱ्याचे आहेत. त्यामुळे ते गावी जात असतील, असं त्यांच्या संपर्कातील सहकाऱ्यांना वाटलं होतं. पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांदरम्यान नीरा हॉटेल आहे. या नीरा नदीच्या पात्रापर्यंत ते आले. या नीरा नदीच्या किनाऱ्यावर हॉटेल वेगास आहे. या हॉटेलच्या पार्किंगमध्ये त्यांनी आपली कार पार्क केली. या कारमध्ये त्यांचा जेवणाचा डब्बा आणि इतर साहित्य आहे. ते गाडीतून उतरल्यानंतर नीरा नदीवर असलेल्या पुलावर आले. त्यानंतर ते कुठे गेले याचा पत्ताच लागला नाही. त्यांचा तेव्हापासून संपर्क झालेला नाही. ते सीसीटीव्हीत पूलावरुन पायी चालत जाताना दिसले आहेत. विशेष म्हणजे हॉटेलपासून फक्त दीडशे ते दोनशे मीटर हे अंतर आहे. पण थोडं पुढे गेल्यानंतर ते नेमकं कुठे गेले याबाबत काहीच पत्ता लागलेला नाही. त्यांचा फोन लागत नाहीय आणि त्यांनी कुणालादेखील फोन केलेला नाही. नीरा नदी पात्रात शशिकांत यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. शशिकांत हे राज्याचे पणन खात्याचे अधिकारी आहेत. त्यामुळे पुणे आणि सातारा या दोन्ही जिल्ह्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोन्ही खात्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. शशिकांत यांचा शोध घेण्याचा शर्थीने प्रयत्न सुरु आहे. पण शशिकांत यांनी आत्महत्या केल्याचा संशय वर्तवला जातोय. त्यांनी आत्महत्या केली असेल तर त्यांनी हे पाऊल का उचललं असावं? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? दबावातून त्यांनी याबाबतचा निर्णय घेतला का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.