सचिन जाधव, प्रतिनिधी सातारा, 10 मे : लोकसभा निवडणुका जशा जवळ येतील तसं कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार, याची चर्चा रंगायला लागली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात श्रीनिवास पाटील आता पुन्हा निवडणुक लढणार नाहीत, अशा चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, त्यामुळे साता-याचा राष्ट्रवादीचा पुढील उमेदवार कोण ही चर्चा कायम सुरु आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, मात्र मतदारसंघाला हिरावून घेण्यासाठी भाजपा खूप आतुर झालेली पाहायला मिळत आहे. 2019 ला झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा श्रीनिवास पाटलांनी 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता, यामुळे भाजापचं सातारा जिल्ह्यात पाय रोवण्याचं स्वप्न धुळीला मिळालं होतं. याचा वचपा काढण्यासाठी भाजापानें आता चांगलीच कंबर कसायला सुरुवात केली आहे, मात्र रामराजेंच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर भाजपाच्या अनेकांची झोप उडाली आहे. श्रीनिवास पाटलांच्या जागी रामराजे हेच परफेक्ट उमेदवार असल्याच्या चर्चा सुद्धा आता साता-यात सुरू झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी रामराजेंचं नाव जाहीर करुन जयंत पाटलांनी सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिलाय, रामराजे नाईक निंबाळकर यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी रामराजे लोकसभेचे राष्ट्रवादीचे पुढील उमेदवार असतील, असं सांगितलंय. रामराजे काही ही म्हणाले तरी आता आम्ही त्यांचच नावं उमेदवारीसाठी पुढे करणार असून सातारा जिल्ह्यात काय चाल्लय हे आता त्यांनी दिल्लीतून पाहायचं, असं सांगत रामराजेंच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलंय. रामराजे माढा लोकसभा लढणार की सातारा लोकसभा हे अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आलंय. जयंत पाटील यांनी साता-याचा उल्लेख भाषणात केल्यामुळे साता-यातून रामराजे लोकसभा निवडणूक लढू शकतात, असे संकेत मिळत आहेत. खासदार उदयनराजेंना शह द्यायचा असेल तर रामराजे हे नाव हुकमी असून सर्व बाजूंची गणितं जुळवण्याची ताकत रामराजेंमध्ये आहे, हे सर्व परिचीत आहे . यामुळे आता श्रीनिवास पाटील यांना रिप्लेस करताना रामराजेच परफेक्ट असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. सातारा हा कधीकाळी राष्ट्रवादीचा गड राहिला असेल, मात्र सध्या भाजपा याठिकाणी जोमानं करत आहे. पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या सर्व च्या सर्व विधानसभा आणि लोकसभेच्या जागा निवडून आणणार असल्याची भीष्म प्रतिज्ञा केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केली. उदयनराजेंना मोठी जबाबदारी देणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलय, यामुळे भाजपाचे पुढील उमेदवार उदयनराजेंच असतील याबाबत जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. सातारा लोकसभा मतदारसंघावर कायम राष्ट्रवादीचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे. सातारा जिल्ह्यात घडणारी प्रत्येक राजकीय घडामोड रामराजेंना विचारात घेतल्याशिवाय पुढे जात नाही. रामराजेंचा जिह्यात तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत असलेला दांडगा जनसंपर्क यामुळे रामराजे हे भाजपाची डोकेदुखी ठरु शकतात. उदयनराजे हे भाजपाचे उमेदवार असतील तर उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीनं वापरलेला हुकमी एक्का असेल आणि उदयनराजेंना यामुळे मोठं आव्हान उभं राहिलेलं पाहायला मिळणार आहे. माढा लोकसभेत रामराजे थोडे कमी पडू शकतात अशी चर्चा माढा लोकसभेतील काही जाणकारांची आहे, त्यातच उदयनराजेंचा काय फरक पडतो हे आम्ही गेल्या पोटनिवडणुकीत पाहिलंय असा टोला शरद पवार यांनी साता-यातील पत्रकार परिषदेत लागवला. असं असलं तरी राष्ट्रवादी रामराजेंच्या अनुभवाचा उपयोग सातारा लोकसभेच्या रणांगणात करणार की माढा लोकसभा मतदारसंघात करणार? हे येणारा काळ आणि त्यावेळी घडणा-या राजकीय घडामोडीच ठरवतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.