मुंबई, 13 जानेवारी : जानेवारीच्या सुरूवातीपासून राज्यात थंडीत वाढ झाली आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यात थंडीच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहेत. जनजीवन विस्कळीत होत आहे. दरम्यान याचा परिणाम शेतवरही दिसत आहे. मागच्या चार दिवसांपूर्वी धुके व ढगाळ हवामान यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांत चिंतेचे वातावरण निर्मिण झाले आहे. वातावरणातील बदलांमुळे शेतीतील विविध पिकांवर मावा, तुडतुडे, करपा आदींसह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यंदा खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यात अशीत परिस्थिती आहे.
जुलैमध्ये सुरू झालेला पाऊस नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राहिल्याने खरीप हंगामातील पिके वाया गेली. त्यानंतर रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा रोपे, बटाटा यांची लागवड केली. रासायनिक खते, कांदालागवड मजुरी, शेतीचा खर्च असा मोठा खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. परंतु अस्मानी संकाटामुळे पिक हाताशी न आल्याने हमीभावाची खात्री शेतकऱ्यांना राहिली नाही. अनेक शेतकर्यांनी ऊस पिकात गहू, हरभरा ही आंतरपिके घेतली आहेत. परंतु मागच्या काही दिवसांत पडलेल्या धुक्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
हे ही वाचा : कोल्हापूरकरांचा नाद खुळा, खासदार महाडिकांनी 51 हजारांना घेतली हापूसची पहिली पेटी!
सतत ढगाळ वातावरण आणि गायब झालेली थंडी व पुन्हा थंडी याचा पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. यावर्षी चार महिने दमदार पाऊस झाल्याने जलपातळी चांगली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची कमतरता भासणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले असले, तरी सध्याचे वातावरण पाहता शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसत आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या आठ दहा दिवसापासून थंडीचा जोर वाढला असल्यानं तापमान किमान पाच अंश पर्यंत जाऊन पोहोचले आहे. याचा परिणाम जळगाव जिल्ह्यात केळी पिकावर झाला आहे. चरका रोगाचा प्रादुर्भावामुळे केळीचे पीक करपून जात आहे. अजूनही थंडीचा कालावधी वाढला तर हे नुकसान अधिक वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
थंडीमुळं आणि धुक्यामुळं रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे. तूर, कापूस, हरभरा, कांदा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
हे ही वाचा : यंदाची संक्रांत बोचऱ्या थंडीने, पुढच्या 48 तासांत गारठा वाढणार, मुंबई, पुण्यात अशी असेल स्थिती
तसेच कोकणातील आंबा, काजू आणि सुपारी उत्पादक शेतकरी देखील चिंतेत आहेत. कारण बदलत्या वातावरणामुळे सुपारीला गळ लागली आहे. गळ लागलेल्या सुपारीला योग्य दर मिळत नाही, त्यामुळं सुपारी फेकून देण्याची वेळ आली आहे. तळकोकणात मोठ्या प्रमाणावर सुपारीचे उत्पादन घेतले जाते. मात्र, येथील सुपारी उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे.