सातारा, 22 नोव्हेंबर : महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार गोंदवले येथील निसर्गप्रेमी रोहीत शंकर बनसोडेला जाहीर करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षापासून साताऱ्यातील माणदेशी दुष्काळी भागात पर्यावरण निसर्ग संवर्धनासाठी व दुष्काळ मुक्तीसाठी रोहीत आणि रक्षीता ही भावंड काम करीत आहेत. गावाच्या माथ्यावर लागलेला दुष्काळी परिस्थितीचा कलंक पुसण्यासाठी रोहीतने गोंदवले खुर्दच्या ओसाड माळरानावर एकला चलोरे म्हणत दुष्काळी परिस्थिती विरुद्ध एकाकी लढा सुरू केला.
2018 पासून माणदेशी दुष्काळी भागातील गोंदवले खुर्द या छोट्या गावातील शालेय विद्यार्थी रोहीत आणि रक्षीता ही भावंड पर्यावरण संरक्षण दुष्काळ मुक्तीसाठी काम करीत आहेत. तसं पाहिलं तर सातारा जिल्ह्यातील दोन भिन्न भौगोलिक परिस्थिती निदर्शनास येतात. एकीकडे राज्यातील सर्वात जास्त पाऊस याच जिल्ह्यातील पश्चिम भागात पडतो, तर दुसरीकडे सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील माणदेशी भूभाग कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थितीत असतो. पावसाळ्यात देखील या भागाला टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. अशा गंभीर परिस्थितीचा सामना येथील शेतकऱ्यांना, नागरिकांना करावा लागतो.
दुष्काळी परिस्थिती विरुद्ध एकाकी लढा
गावाच्या माथ्यावर लागलेला दुष्काळी परिस्थितीचा कलंक पुसण्यासाठी रोहीतने गोंदवले खुर्दच्या ओसाड माळरानावर एकला चलोरे म्हणत दुष्काळी परिस्थिती विरुद्ध एकाकी लढा सुरू केला. थोरल्या भावाच्या मदतीला व त्याच्या संरक्षणाला तेरा वर्षाची रक्षीता माळावर श्रमदान करण्यासाठी सोबत येऊ लागली. दोघांनी मिळून उन्हाळ्याच्या संपूर्ण सुट्टीत 70 समतल चारी काढल्या. एक छोटासा पाझर तलाव तयार केला. शासकीय मोजमापानुसार पावसाचे डोंगर उतारावरून वाहून वाया जाणारे एक कोटी लीटर पाणी आढवून जमिनीत मुरवण्यासाठी ही भावंडे यशस्वी झाली.
फक्त अर्ध्या तासांमध्ये 'ती' काढते पिंपळाच्या पानावर अप्रतिम चित्रं, पाहा Video
2018 पासून पर्यावरणासाठी काम सुरू
येवढ्यावर न थांबता 2018 जूनमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी कधी पिंपरण किंवा वडाच्या मोठ्या फांद्या आपल्या खांद्यावर घेऊन मोठ्या कष्टाने लावायला सुरुवात केली. बोडक्या माळावर दगडधोंडे आणि खुरट्या झाडांशिवाय काहीही न उगवणाऱ्या मुरमाड आणि काळ्या कातळाबरोबर दगडफोड करताना तर कधी पावसाचे पाणी अडविण्यासाठी चर खोदताना ही भावंड प्रयत्न करू लागले. तर कधी आपल्या मजबूत खांद्यावरून पाण्याने भरलेला कॅन असो अथवा मोठा माठ (घागर) घेऊन लावलेल्या झाडांना पाणी घालण्यासाठी कठोर मेहनत घेतली.
बालवयातच निसर्ग रक्षणाचे संस्कार
बालवयातच मनावर चांगले पर्यावरण वादी निसर्ग रक्षणाचे संस्कार घेऊन त्यांनी आपल्या गावाचा, पर्यायाने भागाचा नव्हे तर संपूर्ण माण तालुक्याचा दुष्काळ नाहीसा करण्याचा 'विडा' उचलून जिद्दीने धैर्याने लढू लागले. अगदी कोणाच्याही मदतीशिवाय त्यांनी हे शिवधनुष्य पेलले. आणि त्यात ते यशस्वी होताना दिसत आहेत. आजपर्यंत रोहीत आणि रक्षीता यांनी वेगवेगळ्या सात ठिकाणी हजारो झाडे लावून जगवली आहेत. कोणत्याही अपेक्षा शिवाय रोहीत रक्षीता गोंदवलेच्या माळरानावर निखारी कडवी झुंज देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.