ठाणे, 21 नोव्हेंबर : आपल्या जीवनात छंदाला विशेष महत्व असून विरंगुळा म्हणून जोपासल्या जाणाऱ्या छंदातूनच अनेकदा अप्रतिम कलाकृती जन्म घेते. अशीच एक कला डोंबिवली पश्चिम येथील एका तरुणीने जोपासली आहे. ही तरुणी पिंपळाचे पान कोरून विविध सामाजिक संदेश देणाऱ्या कलाकृती साकारत आहे. ही कलाकृती समाज माध्यमांद्वारे अनेकांपर्यंत पोहोचत असून तिच्या अनोख्या कलेचे कौतुक होत आहे. डोंबिवली पश्चिम येथे गणेशनगर मध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय श्रद्धा पाटील या तरुणीने हा छंद जोपासला आहे. बालपणापासूनच चित्रकलेची आवड असल्याने आणि वडिलांकडून प्रेरित होऊन काही वेगळे केले पाहिजे या कल्पनेतून तिने कुठल्याही कृत्रिम साहित्याचा वापर न करता केवळ पिंपळाच्या पानावर कलाकृती साकारल्या आहेत. श्रद्धाने आता पर्यंत पिंपळाच्या पानावर मातृदिन, पितृदिन, सामाजिक संदेश, राजकारणी, मित्रमंडळी, अनेक थोर पुरुषांची चित्र आपल्या कलेच्या माध्यमातून रेखाटली असून आपल्या कलेतून विविध संदेश दिले आहेत.
पोलिस नसूनही गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारे नितीन यादव, पाहा कसे ठरले कर्दनकाळ, VIDEO
सर्वात पहिले चित्र काढताना तब्बल 24 तासांचा वेळ
लॉकडाऊनच्या काळात घरी असल्यामूळे वेळ जात नसल्याने आणि काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यामुळे घराच्या आजूबाजूला असलेली पिंपळाच्या झाडाची पान गोळा करून त्यावर चित्र काढायला सुरुवात केली. सर्वात पहिले चित्र काढताना तब्बल 24 तासांचा वेळ लागला. मात्र, आता अवघ्या अर्ध्या तासात मी पिंपळाच्या पानावर चित्र रेखाटते, असं श्रद्धा पाटील सांगते. पाचशेच्या वर पिंपळाच्या पानावर रेखाटले चित्र लॉकडाऊन पासून पाचशेच्या वर पिंपळाच्या पानावर चित्र रेखाटले आहेत. यामुळे माझी नोंद इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे. ही कला माझ्यापुरती मर्यादित न ठेवता मी विनामूल्य मुला मुलींना शिकवणार आहे, असंही श्रद्धाने सांगितले.
Video: लॉकडाऊनमध्ये दिसला दगड आणि बदललं आयुष्य, मुंबईकर तरूण झाला देशभर फेमस
तसेच येत्या काळात डोंबिवलीकरांसाठी काहीतरी वेगळं करायचं असल्याचे देखील श्रद्धा सांगते. त्यामुळे नक्कीच येत्या काळात आणखी काहीतरी वेगळं श्रद्धाच्या कलेमार्फत आपल्याला पाहायला मिळणार आहे.