स्वप्निल एरंडोलीकर, प्रतिनिधी
सांगली, 03 फेब्रुवारी : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील खरशिंग येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची दोन एकर द्राक्ष बाग जोरदार वारे वाहू लागल्याने भुईसपाट झाली. या दुर्घटनेत महादेव रंगराव जगताप यांचे सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले. हाता तोंडाशी आलेली बाग कोसळल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील बनेवाडी गावातील महादेव रंगराव जगताप या शेतकऱ्याचे खरशिंग हद्दीमध्ये दोन एकर क्षेत्र द्राक्ष बाग होती. आठ दहा दिवसांत द्राक्ष बाग काढणी सुरू होणार होती. अतिशय परिश्रम घेऊन जगताप यांनी यावर्षी चांगली बाग आणली होती. सकाळी साडेसातच्या दरम्यान जोरदार वाऱ्याने बागेच्या आत शिरकाव केला व बघता बघता बाग एका झपाट्यात खाली कोसळली. बाग कोसळल्याने शेतकरी फार मोठ्या संकटात सापडला आहे. कोसळलेली द्राक्ष बाग पाहून शेतकरी रडू लागले.
आता कर्ज कसं फेडायचं?
यामध्ये पंधरा लाखाचे नुकसान झाले आहे. महादेव जगताप यांच्या कुटुंबावर दुःखाचे सावट निर्माण झाले आहे त्यांनी सोसायटीतून पाच-सहा लाख रुपये तसेच बँकेतून सात लाख रुपये असे कर्ज काढून द्राक्ष बाग लावली होती.
Bamboo Farming : नाशिकच्या तरुणानं कसा केला बांबू शेतीमध्ये रेकॉर्ड, पाहा Photos
सलग दोन वर्षे त्यांना द्राक्ष उत्पादन कमी आले होते. पण यावर्षी त्यांनी बागेकडे चांगले लक्ष दिले होतं. माल ही बरा होता, अत्यंत गरिबीतून कष्ट करून कर्ज काढून या शेतकऱ्याने एखाद्या मुलाप्रमाणे त्या बागेला सांभाळले होते. मात्र नैसर्गिक संकटाने काही क्षणात होत्याचे नव्हते केलं. त्यामुळे आता कर्ज कसं फेडायचं हा सवाल शेतकऱ्यासमोर उभा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Farmer, Local18, Sangli