स्वप्नील एरोंडलीकर, प्रतिनिधी सांगली, 5 मे : नेहमीच्या पद्धतीनं पीक घेण्यापेक्षा वेगळा प्रयोग करून अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करत असतात. प्रयोगशील शेतकऱ्यांचं हे काम अनेकांना प्रेरणा देणारं असतं. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनीही याच पद्धतीनं नवा प्रयोग करत एकरी तब्बल 16 लाखांची कमाई केली आहे. काय केला प्रयोग? देशातील कोणत्याही प्रदेशात, शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणात फोडणी टाकताना आलं लागतंच. आलं आणि लसणाची पेस्ट वापरल्याशिवाय कोणतंही जेवण तयार होत नाही, इतकं आल्याचं महत्त्व आहे. सांगली जिल्ह्याच्या शेजारच्या सातारा जिल्ह्यात आलं हे प्रमुख पीक आहे. सांगली जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी रामचंद्र होनमाणे यांनी या आल्याचं एका एकरात तब्बल 35 टन उत्पादन घेतलं असून त्यामधून 16 लाखांची कमाई केलीय.
आलं हे पीक लागवडीपासून 9 ते 10 महिन्यात काढणीला येतं. सहाव्या महिन्यामध्ये या पिकाची पानं सुकण्यास आणि जमिनीखाली कंद वाढण्यास सुरुवात होते. आल्याच्या शेतामध्ये कारले, दोडकी, दुधीभोपळा, टोमॅटो या भाजीपाल्याचं आंतरपीकही घेता येतं. त्यामुळे शेतकऱ्यांना 10 महिन्यातच दोन उत्पादनं घेता येतात. हे पीक जमिनीत सुरक्षित असल्यानं बाजारभाव कमी असेल तर शेतकरी पिकाची काढणी थांबवू शकतो. त्याचबरोबर हे पीक खरेदी करण्यासाठी व्यापारी आणि एजंट हे शेतामध्ये येतात. शेतकऱ्यांना बाजारात जावं लागत नाही, ’ अशी माहिती रामचंद्र यांनी दिली आहे. शेतकऱ्याची कमाल, सफरचंद शेती करून दाखवली,यंदा दीड लाखांची कमाई सांगली-सातारा जिल्ह्यातील आल्याची निर्यात गुजरात ,राजस्थान , उ. प्रदेश , दिल्ली या राज्यांसह काहीवेळा विदेशातही होते. शेतकऱ्यांना 80ते 120 रुपये प्रती किलो भाव सध्या मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचा लाखोंचा फायदा होत आहे. ऊसपेक्षाही जास्त आल्याच्या शेतीमध्ये फायदा होत असल्याची भावना कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय.