आसिफ मुरसल, प्रतिनिधी
सांगली, 2 एप्रिल : सांगलीच्या जतमध्ये आज (रविवारी) सकाळी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मृतदेहाची अवस्था पाहून हा खून असल्याचे बोलले जात होते. मात्र, हा खून नसून दारू पिऊन पडल्याने आकस्मिक मृत्यू असल्याचा अहवाल शवविच्छेदनानंतर समोर आला आहे, अशी माहिती जत पोलिसांनी दिली आहे. शशिकांत मदने (वय 26) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
शशिकांत मदने यांचा मृतदेह आज सकाळी जत शहरातील यलमादेव मंदिर रोडवरील शेताजवळ आढळून आला होता. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याने त्यांचा खून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, शवविच्छेदन अहवालामध्ये तो दारू पिल्याने पडून त्यांचा मृत्यू झाला असून त्यानंतर अज्ञात हिंस्र प्राण्याने चेहऱ्यावर व गळ्याच्या ठिकाणी हल्ला केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शशिकांत मदने यांचा खून झाला नसून त्याचा आकस्मिक मृत्यू झाल्याचं जत पोलिसांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
वाचा - भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, भर रस्त्यात आरोपींचा अंदाधुंद गोळीबार
सचिन उर्फ शशिकांत बिरा मदने हा व्यवसायाने ड्रायव्हर होता. तो यल्लामादेवी मंदीराजवळ मदने वस्ती येथे राहत होता. रात्री मदने हा आपल्या घरी नव्हता. त्यास दारूचे व्यसन असल्याचे सांगण्यात आले. पहाटे फिरायला जाणाऱ्या लोकांना त्याचा मृतदेह आढळला. यल्लमा देवीच्या विहिरीकडे जाणाऱ्या रोडवर विहिरी पासुन अलीकडे 200 मीटर अंतरावर ही घटना घडली आहे.
यापूर्वी सांगली जिल्ह्यात कोसारी येथे दोघा जणांची हत्या झाली होती. त्या पाठोपाठ जत शहरामध्ये भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खुनाची घटना घडली. जिल्ह्यात एकप्रकारे खूनाची मालिकाच सुरू होती. त्यात आज हा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र, हा खून नसल्याचा अहवाल आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.