आसिफ मुरसल, सांगली प्रतिनिधी
सांगली, 3 जानेवारी : जिल्ह्यातील आष्टा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन तणाव निर्माण झाला आहे. मध्यरात्री शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची गनिमी काव्याने प्रतिष्ठापना केली. दरम्यान, प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हठवण्यात येणार असल्याचे समजल्याने या ठिकाणी रस्तारोको आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. भाजपचे निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
काय आहे प्रकरण?
सांगलीच्या आष्टा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे, त्यानंतर पुतळा परिसरात प्रशासनाकडून 144 कलम लागू करण्यात आले आहे, तर प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी समस्त शिवप्रेमी आणि भाजपचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी महाआरती करणार असल्याचं जाहीर केलं होतं. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने पुतळ्याच्या परिसरामध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाआरती करणार या भूमिकेवर शिवप्रेमी ठाम आहेत, त्यामुळे पुतळ्याच्या मागील बाजूस शिवप्रेमींनी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. कोणत्याही परिस्थितीमध्ये सायंकाळी 7:00 वाजता महाआरती करणारचं, अशी भूमिका शिवप्रेमींनी घेतली होती. तसेच प्रसंगी उद्या वाळवा तालुका बंद करू असा इशारा शिवप्रेमींनी दिला होता. मात्र, पोलीस प्रशासनाने या ठिकाणी आता प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करून पुतळ्याच्या परिसरामध्ये जाण्यापासून मज्जाव केला आहे.
वाचा - “नोटाबंदी हे आर्थिक हत्याकांड, हजारो निष्पाप..” संजय राऊत यांची मोदी सरकारवर टीका
राज्यात अजित पवारांविरोधात आंदोलन
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाही तर स्वराज्य रक्षक होते, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केलं होतं. यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत अजित पवार यांच्याविरोधात निदर्शने सुरू केली आहेत. अजित पवारांनी माफी मागावी, अशी मागणी आंदोलनकर्ते करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.