मुंबई, 5 मार्च : 'मराठी मालिकांमध्ये सर्व ब्राह्मण मुलीच दिसतात, इतर मराठी मुली का नाही?' असा प्रश्न दिग्ददर्शक सुजय डहाके याने उपस्थित केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. अभिनेता शशांक केतकर, सौरभ गोखले आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी या वक्तव्याप्रकरणी सुजय डहाके याच्यावर टीका केली. मात्र आता या वादात संभाजी ब्रिगेडनं उडी घेत सुजय डहाकेला पाठिंबा दर्शवला आहे.
'आजपर्यंत अनेकांनी मराठी चित्रपटातील ब्राह्मण वर्चस्वाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र या क्षेत्रातील ब्राह्मण्यवादी व्यक्तींनी त्यांना टार्गेट करून त्यांचं करिअर संपवलं. मात्र सुजय डहाकेनं हा मुद्दा लावून धरावा. संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीनीशी त्याच्या पाठीशी आहे,' असं संभाजी ब्रिगेडनं म्हटलं आहे.
सुजय डहाकेच्या वक्तव्यानंतर कलाक्षेत्रात खळबळ
मराठीमध्ये सुरु असलेल्या प्रत्येक मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही? असा प्रश्न सुजय डहाके यानं उपस्थित केला. 'मी स्वत: एका मीटिंगमध्ये होतो, तिथं म्हटलं गेलं की ती गायकवाड लागू बंधूच्या जाहिरातील काम कसं करणार? असं बोललं गेलं,' असा धक्कादायक दावा सुजय डहाके याने केला आहे. 'हा कोण येतो डहाके...याला कसा मिळतो राष्ट्रीय पुरस्कार...याचा अनेकांना राग आहे,' असा आरोपही त्याने केला आहे.
सुजय डहाकेवर कलाकारांचा निशाणा
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनेही सोशल मीडियावर एक पोस्ट करत सुजयचं नाव न घेता त्याच्यावर निशाणा साधला आहे. मी ब्राह्मण नाहीये तरी माझ्याकडे काम आहे. असं तेजश्रीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तेजश्री प्रधान हिनं तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं लिहिलं, ‘मी ब्राह्मण नाहीये बरं! सीकेपी आहे. पण गेली अनेक वर्ष माझ्याकडे काम आहे. याला टॅलेंट म्हणूया का?’'
हेही वाचा- सलमान खानचं आणखी एका बॉलीवूड अभिनेत्यासोबत वाजलं, पुन्हा कारण ठरली कतरिना
‘माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका...’
शशांक केतकरही त्याच्या सोशल मीडिया पेजवर व्यक्त झाला आहे. त्यानं फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे ज्यात त्यानं सुजयवर सडकून टीका केली आहे. शशांकनं त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं, ‘माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका, देवधर तुझा अभिनेता, जोशी तुझा संगीत दिग्दर्शक आणि तू कसले बिन बुडाचे आरोप करतोस रे. आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंट ला जागा आहे. कृपा करून हे असले स्टंट करू नकोस. त्या पेक्षा तुझ्या कामावर लक्ष दे जमल्यास. साने आणि मंजुळे हे कॉम्बिनेशन पुरेस नाहीये का तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला? असो... कांबळे, छल्लारे आणि पवार यांच्या दिग्दर्शनाखाली हा केतकर रोज काम करतो आणि याचा मला अभिमान आहे. तू कोणत्या जाती धर्माचा आहेस याचा तसूभरही विचार डोक्यात न आणता तुझं कल्याणच होऊदे, तुझे चित्रपट चालू दे हीच इच्छा आहे.'
'...तर आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील'
अभिनेता सौरभ गोखलेनंही जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं, स्वतःस अत्यंत प्रतिभावान आणि अभ्यासू समजणारे दिग्दर्शक मा. सुजय डहाके... आपण केलेली वक्तव्ये आणि विधाने यावर इतर कलाकारांनी आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांनी स्पष्टीकरण द्यावे इतकी तुमची लायकी नाही. पुन्हा या प्रमाणे जातीयवाद आणि जातीपातीचे राजकारण या कलाक्षेत्रात घुसविण्याचा प्रमाद आपणाकडून घडल्यास आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील याची नोंद घ्यावी.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.