तळेगाव, 31 मार्च: मुंबई- पुणे महामार्ग वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्यावर दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहन चालवणाऱ्यांना विशेष काळाजी घ्यावी लागते. आज मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Highway) रिक्षा आणि मालवाहू डंपरचा भीषण अपघात (Rickshaw Hits Dumper) झाला आहे. या अपघातात (Road Accident) रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या अपघातत कोणतीही जीवितहानी नाही, परंतु या दुर्दैवी अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई-पुणे महामार्गावर तळेगाव लिंब फाटा चौकात एका भरधाव रिक्षाने पुढे जाणाऱ्या हायवा डंपरला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या रिक्षाचालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने, रिक्षा पुढे जाणार्या हायवा डंपरला जोरदार धडकली. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा क्षणात चक्काचूर झाला आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. तसंच रिक्षाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या महामार्गावरील इतर वाहन चालकांनी अपघातग्रस्त रिक्षामध्ये अडकलेल्या जखमी चालकाला बाहेर काढून उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं आहे. दरम्यानच्या काळात या अपघातामुळे मुंबई -पुणे महामार्गावर वाहतुक कोंडी झाली होती. त्यांनतर काही लोकांच्या मदतीने रिक्षा ढकलून रस्त्याच्या बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. (वाचा - Sachin Vaze यांचा आणखी ‘कार’नामा समोर,महागडी गाडी नवी मुंबईच्या रस्त्यावर सापडली ) खरंतर तळेगाव शहरातील लिंब फाटा चौकात वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील तळेगाव परिसरात अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. या चौकात कायमस्वरूपी महामार्ग पोलीस अथवा सिग्नल यंत्रणा नसल्याने वाहन चालकांची मोठी गैरसोय होतं आहे. त्यामुळे कधी कधी अशा जीवघेण्या अपघातांना सामोरं जावं लागतं. याठिकाणी दिवसाआड सातत्याने होणाऱ्या लहान-मोठ्या अपघातामुळे लिंब फाटा चौक वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.