रत्नागिरी, 07 सप्टेंबर : गणपतीपुळे येथे 12 महिने पर्यटकांची गर्दी असते. दरम्यान आलेले पर्यटक समुद्र किनाऱ्यावर पोहण्यासाठी जात असतात. परंतु या समुद्राचा काही भाग खोलगट आणि धोक्याचा असल्याने कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. (Ganpatipule Red Zone) यामुळे गणपतीपुळे प्रशासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. तेथे असणाऱ्या पोलिस चौकीच्या मागील बाजूस किनाऱ्यावरील 50 मीटर भाग रेड झोन ठरविण्यात आला आहे. या ठिकाणी पर्यटकांना पोहण्यासाठी मनाई केली असून, गृहरक्षक दल व पोलिसांसह जीवरक्षकांची करडी नजर येथे असणार आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी पर्यटकाला गणपतीपुळे किनाऱ्यावरील स्थानिक व्यापाऱ्याने जीव धोक्यात घालून वाचविले होते. सुमारे एक तासाहून अधिक काळ हा थरार सुरू होता. त्यानंतर काही दिवसांत सांगलीच्या दोन पर्यटकांना जीवरक्षकांनी वाचविले. पावसाळी वातावरणामुळे समुद्राच्या पाण्याला करंट असून, किनारी भागात लाटांचा जोर अधिक आहे. पर्यटकांनाही सुरक्षिततेसाठी आवाहन केले जाते; परंतु पर्यटक त्याकडे कानाडोळा करतात.
हे ही वाचा : गणपती सोडताना वाहून गेलेले दोन मुस्लीम बांधव तब्बल 15 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सापडले
गणपतीपुळे पोलिस चौकीच्या मागील बाजूस पाण्यात चाळ (खड्डा) तयार होत आहे. भरती-ओहोटीच्या कालावधीत ही परिस्थिती निर्माण होते. त्यात पोहणारा पर्यटक सापडला की तो खोल समुद्राकडे ओढला जातो. सध्या पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने जयगड पोलिस ठाण्यातर्फे चाळ निर्माण होणारा परिसर पोहण्यास धोकादायक म्हणून ‘रेड झोन’ जाहीर केला आहे. सुमारे 50 मीटर हा भाग असून तेथे पर्यटकांनी पोहण्यास जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले. ‘रेड झोन’ दर्शविण्यासाठी लाल रिबीन बांधून ठेवण्यात आली आहे. तेथे दिवसभरात गृहरक्षक दलाचे दोन जवान नियुक्त केले आहेत.
समुद्रात वाहून जाताना दोघांना वाचवले
गणपतीपुळे समुद्रात पोहायला गेलेल्या सांगलीतील दोघांच्या बाबतीत आज घडला. मात्र याचवेळी गणपतीपुळे येथील जीवरक्षक देवदूतासारखे त्यांच्या मदतीला धावल्यामुळेच त्यांचे प्राण वाचले. भूषण हेमंत अडसूळे, हेमंत सीताराम अडसूळे बुडत असताना बचावलेले हे दोघेही आता सुखरूप आहेत. त्या दोघांना बुडताना गणपतीपुळ्यातील जीवरक्षकांनी वाचवले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
हे ही वाचा : अनंत चतुर्थी पावसात जाणार, ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता
भूषण हेमंत अडसूळे (22), हेमंत सीताराम अडसूळे (47) दोघेजण दुपारी साडेतीन वाजता समुद्रात पोहायला गेले असता ते बुडत होते. त्यांनी वाचण्याकरिता आरडाओरडा केला. त्यावेळी जीवरक्षक रोहित माने, स्थानिक व्यावसायिक अक्षय सुर्वे उर्फ बंटी शरद मयेकर या सर्वांनी मिळून त्यांचा जीव वाचवला.