मुंबई, 19 फेब्रुवारी : सारे हेवेदावे बाजुला ठेवत शिवसेना - भाजपनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेसाठी भाजप 25 तर शिवसेना 23 जागांवर लढणार आहे. तर, विधानसभेसाठी मित्रपक्षांचं जागा वाटप झाल्यानंतर 50-50चा फॉर्म्युला ठरला आहे. पण, या युतीमुळे मात्र केंद्रीय मंत्री रामदास आठवले नाराज झाले आहेत. रामदास आठवले यांनी आता आरपीआयला दोन जागा द्या, अशी मागणी केली आहे.
आपली मागणी घेऊन रामदास आठवले शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. आरपीआयला जागा न दिल्यास दलित नाराज होतील. त्याचा फटका हा लोकसभा निवडणुकीमध्ये बसेल असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना दक्षिण मुंबईतील आणि राज्यात इतर ठिकाणी एक अशा दोन जागा हव्या आहेत.
असा आहे युतीचा फॉर्म्युला
लोकसभा
एकूण जागा - 48
भाजप - 25 जागा लढणार
शिवसेना - 23 जागा लढणार
विधानसभा
एकूण जागा - 288
मित्रपक्षांची चर्चा करून त्यांच्याशी जागावाटप झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना 50-50 टक्के जागा लढवतील.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
- लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवणार. फक्त निवडणुकीसाठीच नाही तर अनेक व्यापक मुद्यावर आम्ही एकत्र लढणार. राम मंदिर लवकरात लवकर व्हावं ही भाजपचीही भूमिका आहे.
- भाजप आणि शिवसेनेची 25 वर्षांची मैत्री. काही मतभेद झाले असले तरी हिंदुत्वाच्या विचारांशी आम्ही बांधील आहोत. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी काही मतभेत झाले होते. मात्र गेली साडेचारवर्ष आम्ही केंद्रात आणि राज्यात एकत्र आहोत.
- शेतकरी कर्जमाफी योजनेचा फायदा ज्या शतकऱ्यांना मिळाला नाही. त्यांनाही नव्याने फायदा कसा मिळेल याची काळजी घेणार.
- नाणार प्रकल्प आता कोकणात होणार नाही. ज्या ठिकाणी लोकांचा विरोध नसेल त्या ठिकाणी होईल.
- काही पक्ष एकत्र येवून राष्ट्रीय स्तरावर महाघाडी तयार करत राष्ट्रीय विचारांना आव्हान देण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे आम्ही एकत्र.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
- विधानसभा निवडणुकीनंतर जबाबदारीचं वाटपही सम-समान होईल हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
- झालं गेलं विसरून जाऊ, पण कटू अनुभव येऊ नये अशी इच्छा आहे.
- शहीदांचं बलिदान वाया जाणार नाही. केंद्र सरकार पाकिस्तानला धडा शिकवेल अशी आशा आहे.
- देशाच्या व्यापक हितासाठी आम्ही युती केली. कर्जमाफीत काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दूर केल्या जातील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
- देशात तातडीने राम मंदिर झालंच पाहिजे. नाणार प्रकल्प ज्या ठिकाणी लोकांना मान्य असेल त्या ठिकाणी व्हावा.
अमित शहा काय म्हणाले?
-महाराष्ट्रातल्या 48 पैकी 45 जागा आम्ही जिंकणार आहोत.
- भाजप आणि शिवसेनेच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण झाली. केंद्रात आणि राज्यात भाजप आणि शिवसेनेचं सरका यावं ही लोकांची इच्छा आहे.
- शिवसेना आणि अकाली दल हे भाजपचे सर्वात जुने सहकारी. आमच्यातले मतभेत आजच, याच टेबलवर दूर झाले. आम्ही आता नव्याने कामाला लागणार आहोत.
- राम मंदिर, सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि महत्त्वाच्या मुद्यावर आम्ही एकत्र आहोत.
2014 चं असं होतं जागा वाटप
2014 च्या निवडणूकीत भाजपने 26 तर शिवसेनेने 22 जागा लढवल्या होत्या. लढवलेल्या 26 पैकी भाजपने 23 तर शिवसेनेने 22 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या. महाराष्ट्रातल्या एकूण 48 जागांपैकी भाजप आणि शिवसेनेने तब्बल 41 जागा जिंकल्या होत्या. विरोधकांच्या वाट्याला फक्त 7 जागा आल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ramdas athawale, RPI