मुंबई, 27 फेब्रुवारी : मराठी दिनाचं औचित्य साधून राज ठाकरे यांनी काश्मिरी युवतीने गायलेल्या संत ज्ञानेश्वरांची रचनेचा VIDEO सोशल मीडियावर शेअर केला आहे. मराठी दिनाच्या अनोख्या शुभेच्छा देताना राज ठाकरे यांनी हा व्हिडीओ आपल्या भाषेच्या वैभवाची जाणीव करून देवो, असं म्हटलं आहे. शमीमा अख्तर या काश्मिरी गायिकेनं ज्ञानेश्वरांची रचना थेट काश्मिरी ढंगात सादर केली आहे. या व्हिडीओ साँगचं चित्रीकरणही काश्मीरमध्ये झालं आहे. संत ज्ञानेश्वरांची सुप्रसिद्ध रचना - रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा लता मंगेशकरांनी गायली आहे. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी या रचनेला संगीत दिलं आहे. हीच रचना काश्मिरी साज लेवून शमीमा अख्तर या गायिकेनं सादर केली आहे. सरहद म्युझिक यांचा हा VIDEO खास जागतिक मराठी दिनानिमित्त YouTube वर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
संत ज्ञानेश्वरांच्या रचना पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लतादीदींनी कळसास नेल्या.त्यातील एक रचना शमीम अख्तर ह्या काश्मिरी तरुणीला काश्मिरी वाद्यसाजात गावीशी वाटणं,हा कश्मिरीयतने मराठीप्रति दाखवलेला आदर,तो वृद्धिंगत होवो, राज्याला आपल्या वैभवाची जाणीव करून देवो.https://t.co/wX1BiCCUNT
— Raj Thackeray (@RajThackeray) February 27, 2020
‘संत ज्ञानेश्वरांची एक रचना शमीम अख्तर ह्या काश्मिरी तरुणीला काश्मिरी वाद्यसाजात गावीशी वाटणं, हा कश्मिरीयतने मराठीप्रति दाखवलेला आदर, तो वृद्धिंगत होवो, राज्याला आपल्या वैभवाची जाणीव करून देवो’, असं राज ठाकरे यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. रुणुझुणू रे भ्रमरा या गाण्याला संगीतसाज चढवणारे वादकही काश्मिरी आहेत. रबाब या काश्मिरी वाद्याच्या साथीत शमीमा हे गाणं सादर करते तेव्हा काश्मिरीयतचा वेगळाच अनुभव ऐकायला मिळतो. या गाण्याला वाद्यसंगीत म्हणून काश्मिरी वाद्यच प्रामुख्याने वापरण्यात आली आहेत. त्यामध्ये रबाबखेरीज टुमकनार, मटका अशी इतर काश्मिरी वाद्यही या गाण्यात वापरली आहेत. अब्दुल हमीद भट यांन रबाब वाजवला आहे. तर इतर साथसंगत मोहम्मद युसफ राह, सलीम जहांगिर, प्रमोद शेंगाडे यांची आहे. शमीमा अख्तर या गायिकेनं यापूर्वी संत ज्ञानेश्वरांचं पसायदानही गायलं आहे. तोही व्हिडीओ YouTube वर आहे.