मुंबई, 22 मार्च : राज ठाकरे यांच्या गुढी पाडवा मेळाव्यातल्या भाषणाला सुरूवात झाली आहे. भाषणाच्या सुरूवातीलाच राज ठाकरे यांनी शिवसेना आणि धनुष्यबाणाबाबत सुरू असलेल्या वादावर भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातली दोन वर्षातील राजकीय स्थिती पाहतोय, राजकारणाचा झालेला बट्ट्याबोळ आपण सगळंच पाहत आलो. हे सगळं राजकारण पाहत असताना वाईट वाटत होतं. ज्यावेळी शिवसेना आणि धनुष्यबाण हे तुझं का माझं ज्यावेळी सुरू होतं त्यावेळी वेदना होत होत्या.
लहान असताना माझ्या छातीवर वाघ असायचा. लहानपणापासून राजकारण पाहत आलो, बाळासाहेबांसोबत अनुभवत आलो. अनेक्यांच्या घामातून उभी राहिलेली संघटना. माझा वाद विठ्ठलाशी नाही, तर त्याच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांशी आहे, हे मी तेव्हा म्हणालो होतो. हीच चार टाळकी हा पक्ष खड्ड्यात घालणार, खड्ड्यात घातल्यानंतर त्याचा वाटेकरी व्हायची माझी इच्छा नाही म्हणून बाहेर पडत आहे, हे मी तेव्हा बोलत होतो, असं राज ठाकरे म्हणाले.
आधीच्यांना पक्ष सांभाळता आला नाही, आताचे काय करतात ते बघू? असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. 2006 ला मी पक्ष याच शिवतीर्थावर स्थापन केला. त्यावेळी काय झालं, कसं झालं याचा चिखल मला करायचा नव्हता. काही गोष्टी पसरवल्या गेल्या. राज ठाकरेंना शिवसेनापक्षप्रमुख पद पाहिजे होते, हे सगळं झुट आहे. मला तसं कधी मनात आलं नाही, कुणाला ते पेलणार नाही, ते झेपणार नाही. एकाला झेपलं नाही, माहित नाही, दुसऱ्याला झेपणार नाही, असं विधान राज ठाकरे यांनी केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Raj Thackeray