धुळे, 2 जून : धुळ्यातून (Dhule) एक मोठी बातमी समोर आली आहे. धुळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने शहरातील अवैध खाजगी सावकारी करणाऱ्यां विरोधात धडक कारवाई केली आहे. त्याच दरम्यान धुळे शहरातील एलआयसी किंग अशी ओळख असलेल्या राजेंद्र बंब (LIC Agent Rajendra Bamb) या एलआयसी एजंटच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आङे. या कारवाईत राजेंद्र बंब याच्या घरातून कोट्यवधींची रोकड आणि इतर मालमत्ता जप्त केली आहे. कोट्यवधींचं घबाड हाती आर्थिक गुन्हा शाखेसह अन्य पोलिसांच्या पाच पथकांनी घेतलेल्या झडती पोलिसांना राजेंद्र बंब आणि त्यांच्या कुटूंबियांकडे मोठे घबाड सापडले आहे. राजेंद्र बंब आणि त्यांच्या भावाकडून पोलिसांनी 1 कोटी 42 लाख 19 हजार 550 रुपयांची रोकड जप्त केली आहे. तर 46 लाख 22 हजार 378 रुपयांचें दागिने जप्त करण्यात आले आहेत. यासह कोट्यवधी रुपये किमतीच्या मालमत्तेचे कागदपत्रांची पोलिसांना सापडले आहेत.
राजेंद्र बंब याच्याकडून 38 कोरे धनादेश, 104 खरेदी खत, 13 कोरे मुद्रांक आणि 204 मुदत ठेवीच्या पावत्या सापडले. तब्बल दहा तासांपेक्षा अधिक वेळ झळती नंतर हे घबाड समोर आले आहे. हे घबाड पाहून आणि त्याचा कारनामा पाहून पोलिसही चक्रावले आहेत.
नेमका प्रकार काय? राजेंद्र बंब हा धुळ्यातील एक मोठा एलआयसी एजंट आहे. त्याला एलआयसी किंग असंही म्हटलं जातं. धुळे शहरात एका बनावट फायनान्स कंपनीच्या नावे कर्ज देऊन राजेंद्र बंब हा अवैधरित्या 24 टक्के दराने वसुली करत असल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. एका पीडिताने या संदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर त्याचा हा कारनामा समोर आला आहे.
राजेंद्र बंब याच्याकडे कामाला असलेल्या एका व्यक्तीला पैशांची गरज होती. त्यावेळी बंब याने त्याला पैसे दिले आणि पैश्याच्या मोबदल्यात त्याच्या वडिलोपार्जित संपत्तीचे कागदपत्र बंब यांनी आपल्या ताब्यात ठेवले. व्याजासकट पैसे परत करूनही बंब याने त्या व्यक्तीला कागदपत्रे दिली नाहीत. काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी अवैध सावकारी विरोधात तक्रारी करण्याचे आवाहन नागरिकांना केले. पोलीस अधीक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पीडित व्यक्तीने पोलिसांची भेट घेतली आणि त्यानंतर घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करत तपास सुरू केला. त्यानंतर बंब याच्या घरी धाड टाकली असता कोट्यवधींचं घबाड हाती आलं. बनावट फायनान्स कंपनीद्वारे गंडा जी पी फायनान्स कंपनी मुंबईतील कांदिवलीत असल्याचं तो नागरिकांना सांगत असे. ही बनावट फायनान्स कंपनी स्थापन करून बंब हा लोकांना व्याजाने पैसे देत होता. 24 ते 36 टक्के व्याजाचे दर लावत पठाणी वसुली बंबकडुन सुरू होती अशी सुद्धा माहिती समोर आली आहे.