हरिष दिमोटे, प्रतिनिधी शिर्डी, 22 ऑक्टोबर : या वर्षीचा ‘मोस्ट कन्फ्युज पॉलिटिशियन अवॉर्ड’ हा उद्धव ठाकरे यांना दिला पाहिजे अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रम शिर्डीतल्या लोणीमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे गोंधळलेला माणूस आहे. सरकारमध्ये राहून निर्णय घेण्याची क्षमता आता शिवसेनेत नाही. जुमलेबाज सरकार म्हणणारा शिवसेना पक्ष हाच मोठा जुमला असल्याची टीका विखे पाटील यांनी केली. विरोधी पक्षनेता म्हणून मी काय काम करावं हे तुम्ही सांगायची गरज नाही. उलट सत्तेत राहून शिवसेना केवळ मलिदा खाण्याचं काम करत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. शिवसेनेने आपला स्वाभिमान केव्हाच गमावला आहे असं म्हणत विखे पाटील या कार्यक्रमात शिवसेनेवर जोरदार बरसले आहेत. बरं इतक्यावर ते थांबले नाहीत तर, शिवसेनेत थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल तर सत्तेतून बाहेर पडा असं आवाहनच यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं. शिवसेनेची विश्वासार्हता संपली आहे, म्हणून त्यांना रामाचा आधार घ्यावा लागत आहे. शिवसेनेने आपली ओळख गमावली आहे म्हणून जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या शिवसेनेला आता जय श्रीराम म्हणण्याची वेळ आली आहे, असं म्हणत विखे पाटील यांनी शिवसेनेचा राम मंदिर मुद्दा हाणून पाडला. तर तुमची भूमिका प्रामाणिक असेल तर सत्तेतून बाहेर पडा त्यासाठी अयोध्येला जाण्याची गरज नाही असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेवर बाण सोडला आहे. बरं, या सगळ्यात विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही सडकून टीका केली आहे. पंतप्रधानांकडून राज्याची निराशा झाली आहे. देशाचे पंतप्रधान शिर्डीत आले मात्र त्यांनी राज्याला काहीच दिले नाही. दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रासाठी काहीतरी पॅकेज देतील अशी अपेक्षा होती पण राज्यातील जनतेचा भ्रमनिरास झाला असल्याची टीका विखे पाटील यांनी केली. भाजप नगरसेवकाने पोलिसाला जबरदस्त धुतलं, VIDEO व्हायरल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.