पिंपरी चिंचवड, 20 नोव्हेंबर : काहीच दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी महिला पत्रकारासोबत बोलताना केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. यानंतर आता सुप्रिया सुळे यांनीही महिला पत्रकारांना साडी का नेसत नाही? असा प्रश्न विचारला आहे. ‘चॅनलमधल्या मुली साडी का नाही नेसत? शर्ट आणि ट्राऊजर का घालतात? मराठी भाषा बोलताना? मग मराठी संस्कृतीसारखे कपडे आपण का नाही घालत? आपण सगळ्या गोष्टींचं वेस्टर्नायझेशन करतोय’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याचा भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी समाचार घेतला आहे. ‘टिकलीवर टीका करणारे साडीवर या नेत्यांना सोलणार का..? चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या,’ असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे. यासोबतच चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे.
'टिकली'वर टीका करणारे 'साडी'वर या नेत्यांना सोलणार का..?
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 20, 2022
चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या !
बिंदी पर टिप्पणी करने बखैडा खडे करनेवाले "साड़ी" पर टिप्पणी करने वाले इस नेता को टिप्पणी किये बगैर बखैडा खडा किये बगैर ही छोड़ देंगे क्या..?
चलो आप लोगों की इस बार परिक्षा हो जाये pic.twitter.com/O55GM9xqWt
काय म्हणाले होते संभाजी भिडे? संभाजी भिडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला मंत्रालयात आले होते. संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली, पण या भेटीनंतर महिला पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केलं. मंत्रालयातून बाहेर आल्यानंतर महिला पत्रकाराने संभाजी भिडे यांना मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायचं कारण विचारलं, पण संभाजी भिडे यांनी या महिला पत्रकाराला उत्तर दिलं नाही. तुम्ही टिकली लावली नसल्यामुळे आपण उत्तर देणार नसल्याचं संभाजी भिडे म्हणाले. ‘आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री भारतमातेचं रूप आहे. भारत माता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन,’ अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला दिली आणि ते निघून गेले.