पुणे, 31 मे : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात (TET Exam Scam case) अटकेत असलेले राज्य शासनाच्या परीक्षा विभागाचे तत्कालीन प्रमुख तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी तुकाराम नामदेव सुपे यांना दोन गुन्ह्यात सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. तुकाराम सुपे यांना 17 डिसेंबर 2021 रोजी पुण्यातील सायबर पोलिसांनी अटक केली होती. शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. काय आहे नेमकं प्रकरण ? पोलिसांनी म्हाडा पेपरफुटीचा सूत्रधार डॉ. प्रितीश देशमुख याच्या घराची झाडाझडती घेतली असता तेथे टीईटीचे 50 ओळखपत्र आढळून आले होते. याच्याकडे टीईटीच्या ते चाळीस आपात्र विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे मिळाली होती. टीईटीची परीक्षा 21 नोव्हेंबर रोजी झाली होती. टीईटीला परीक्षांसाठी साडेचार लाख विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. प्रश्नसूची आणि उत्तरसूचीमध्ये तफावत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. विद्यार्थ्यांच्या आक्षेपानंतर tet च्या परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आलेली नाही. प्रितीश देशमुख याच्या घरी टीईटीची 50 ओळखपत्रे सापडल्याने टीईटी परीक्षेतही घोटाळा झाला का? असा सवाल उपस्थित होऊ लागला. त्यानंतर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावले. या चौकशीनंतर तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली होती. तुकाराम सुपे च्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड टीईटी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी तुकाराम सुपे यांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी सुपे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत लाखोंचा मुद्देमाल आढळला होता. यानंतर आता पोलिसांनी सुपे यांच्या घरी आणखी एक धाड टाकली. यामध्ये पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलं होतं. छापेमारीत आरोपी सुपे याच्या घरात पोलिसांना दोन कोटीहून अधिक रुपयांची रक्कम आणि लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आढळले होते. सुपे यांच्या घरी छापा टाकायच्या आधी पत्नी आणि मेहुण्याने ही रक्कम दुसऱ्या ठिकाणी लपवली होती. पण पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता, मोठं घबाड पोलिसांच्या हाती लागलं होतं. याआधी सुपे याच्या घरी पोलिसांना 88 लाख रुपयांचं सोनं आणि काही रोकड मिळाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.