पुणे, 11 सप्टेंबर : सायंकाळपासून पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. येथील दांडेकर पूल परिसरात आंबील ओढ्याच पाणी काही नागरिकांच्या घरात शिरल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. तासाभराच्या पावसाने नागरिकांची दाणादाण उडाली. या परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन बसले आहे. पाणी वाढायच्या भीतीने काही जणं मौल्यवान चीजवस्तू घेऊन घराबाहेर पडले होते. रखडलेले एसआरए प्रकल्प लवकर मार्गी लावावा, आणि आमची राहण्याची सोय करून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अनेकांच्या घरात पाणी साचलं आहे. तर एकाच्या घरात पाण्यासह मुंगूसही शिरला होता. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पुण्यात आज पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. यामध्ये चंदननगर पोलीस ठाण्याचादेखील समावेश आहे. मुसळधार पावसामुळे चंदननगर पोलीस ठाण्यात पाणी शिरलंय. पोलीस कर्मचारी बसत असलेल्या कॅबिनपर्यंत हे पाणी पोहोचलं आहे. या पाण्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे संकट काळात सर्वसामान्यांसाठी धावून जाणाऱ्या पोलिसांच्या कार्यालयातच पाणी शिरल्याने पाऊस किती भयानक होता याचा प्रत्यय येतोय. चंदननगर पोलीस ठाण्यात कशाप्रकारे पाणी साचलं आहे त्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
पुण्यातील दांडेकर पूल परिसरातील वस्तीत आंबील ओढ्याच पाणी काही नागरिकांच्या घरात शिरल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. pic.twitter.com/fKtJkaVwZY
— News18Lokmat (@News18lokmat) September 11, 2022
रविवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून कात्रज धनकवडी परिसरासह पर्वती भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अंबिल ओढ्याला प्रचंड पूर आला आहे. दरम्यान पुणे महागरपालिका, SRA आणि खासगी बांधकाम व्यावसायिक केदार असोसिएट यांच्या मनमानी कामकाजामुळें येथील 22 कुटुंबियांचा जीव धोक्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिकाने केलेल्या चुकीच्या कामामुळे येथील 11 ते 12 घरांत सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ओढ्याचे पाणी शिरले आहे.