पंतप्रधान मोदींनी वारकऱ्यांचा वेश परिधान केला होता. डोक्यावर वारकरी पगडी आणि कपाळावर अभीर-गोपीचंदाचा टिळा लावून धार्मिक वातावरणात मोदींनी विठुमाऊलीचं दर्शन घेतलं.
श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू येथील प्रमुख नितीन मोरे यांनी सांगितलं की, 1 कोटी रुपये खर्च करून या ‘शिळा’मंदिराचं निर्माण केलं गेलं आहे. हा सर्व पैसा भक्तांनी दान दिला होता. मोरे म्हणाले, ‘आम्ही राज्य सरकारकडून कोणतंही अर्थसहाय्य घेतलं नव्हतं. मंदिर बांधण्यासाठी 6 वर्षे लागली.’ त्यांनी सांगितलं की मंदिरात एक शिळा असेल, ज्याला वंदन करून वारकरी संप्रदाय दरवर्षी वारीला सुरुवात करतील. दरवर्षी येथून वारी पंढरपूरला जाते.
संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिर लोकार्पणावेळी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी त्यांचीही भेट घेतली.
एक चिमुकला वारकरीही या कार्यक्रमादरम्यान पाहायाला मिळाला. वारकरी पगडी, सदरा, उपरणं, अभीर-गोपीचंदाचा टिळा, गळ्यात माळ असा वेश करत या छोट्या वारकऱ्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
पंतप्रधान मोेदींनी उपस्थितांना हात जोडून नमस्कार केला. पंतप्रधान मोदी देहूमध्ये येण्याआधीच त्यांचा हा दौरा चर्चेचा विषय बनला आहे. कारण देहू येथील कार्यक्रमावेळी मोदींना देहू संस्थानकडून एक पगडी भेट दिली. यासाठी पुण्यातून खास पगडी बनवून घेण्यात आली होती.
कार्यक्रमावेळी, पंतप्रधान मोदींसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमावेळी भाषण करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव घेतल्यामुळे नंतर वाद निर्माण झाला होता.