पुणे, 27 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) आज पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते आज दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर (Pune Dagadusheth Halwai Temple) परिसरात गेले. पण पवार गणपती बाप्पाचं दर्शन न घेताच बाहेरुन मुख दर्शन घेऊन निघून गेले. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. खरंतर शरद पवार दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी जाणार होते. मात्र आयत्यावेळी पवारांनी मंदिरात न जाण्याचा निर्णय घेत बाहेरुन दर्शन घेणं पसंत केलं. आपण नॉनवेज खाल्लं असल्याने मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी न जाता बाहेरुन दर्शन घेतल्याचं शरद पवार म्हणाले. या दरम्यान शरद पवारांनी आज पुण्यात भिडे वाड्याची (Bhide Wada) पाहणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या विषयी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. "मंदिराला आणखी नव्या जागेची आवश्यकता आहे. सदर जागा ही राज्याच्या गृह विभागाची आहे. मंदिराच्या व्यवस्थापनेच्या ट्रस्टचा मान राखून शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे भेटीसाठी येणार होते. त्यानुसार ते आले. आम्ही त्यांच्यासोबतच होतो. मंदिराता दर्शनाचा कोणता प्लॅन नव्हता. आम्ही जागेची पाहणी केली. कारण पुणेकरांच्या आणि महाराष्ट्राच्या आस्थेचं हे प्रतिक आहे. दगडूशेठ गणपतीवर अनेकजणांची श्रद्धा आहे. मला या गोष्टीता सार्थ अभिमान आहे की, मला आणि पवारांना काही दोघं-तिघांनी दर्शन घेण्याबाबत विचारलं. पण पवारांनी आपण नॉनवेज खाल्लं असल्याने मी चुकीचा पायंडा पाडणार नाही. माझ्या बुद्धीला ते पटणार नाही. त्यामुळे मी बाहेरुनच दर्शन घेतो, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं", अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
(आर्यन खानला NCB कडून क्लीन चिट मिळाल्यावर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया)
'ही सात्विकतेची आणि भाविकतेची सर्वोच्च पायरी', आनंद दवेंची प्रतिक्रिया
दरम्यान, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी शरद पवार यांच्या या कृतीचं स्वागत केलं आहे. "नॉनवेज खाल्लं म्हणून मंदिरात न जाणं ही सात्विकतेची आणि भाविकतेची सर्वोच्च पायरी आहे. एखादा कट्टर भक्तचं असं करु शकतो. पवारांच्या या भूमिकेचं मन:पूर्वक स्वागत", अशी प्रतिक्रिया आनंद दवे यांनी दिली आहे.
शरद पवारांनी एकदाही दगडूशेठ हलवाई गणपतीचं एकदाही दर्शन घेतलेलं नाही?
शरद पवार आज दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात येऊन दर्शन घेतील, अशी बातमी समोर आल्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. कारण या मंदिराची स्थापना झाल्यापासून पवार एकदाही या मंदिरात दर्शनासाठी आलेलं कुणी पाहिलेलं नाही. संबंधित बातमी आल्यानंतर काही वेळाने बातमी आली की शरद पवार हे मंदिराच्या समोर असलेल्या भिडेवाडीची पाहणी करतील. शरद पवार मंदिरात जाण्याबाबत कधीही जाहिररीत्या वाच्यता करत नव्हते. तसेच मंदिर नव्याने बांधल्यापासून ते एकदाही दर्शनासाठी आले नाहीत. एकदा फक्त ते गणेशोत्सवादरम्यान समोर असलेल्या मंडळाच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते, असं दगडूशेठच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.