मुंबई, 15 जुलै : मागच्या कित्येक दिवसांपासून माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे निष्ठावंत आमदार पृथ्वीराज चव्हाण नाराज असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस पक्षातील नाराजीबद्दल त्यांनी कित्येकवेळा जाहीरपणे नाराज व्यक्त केली आहे. ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार का? याबाबत जोरदार चर्चांणा उधाण आले आहे. चव्हाण यांची कराडमध्ये आज पत्रकार परिषद होणार आहे. काँग्रेस पक्षातील अंतर्गत बंडाळीवर सडकून टीका केल्यानंतर चव्हाण कराडमध्ये प्रथमच प्रसार माध्यमांशी बोलणार आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
पृथ्वीराज चव्हाण हे पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत मागील काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेते गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधीवर जोरदार टीका केली होती. त्या दिवशी पृथ्वीराज चव्हाण यांनीही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती.
हे ही वाचा : मविआचा आणखी एक निर्णय रद्द, शिंदे सरकारकडून आता नव्याने होणार नियुक्ता
मागील 24 वर्षात काँग्रेस अध्यक्ष पदाचे संघटनात्मक पदांच्या निवडणुका झालेले नाहीत. पक्षात होय बा’ संस्कृती वाढत आहे. प्रत्येक निवडणुकीत पक्षाचा पराभव होत असूनही त्यावर चिंतन होत नाही. सात आमदारांनी पक्षविरोधी भूमिका घेत विधानपरिषद निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले होते. पक्षाशी गद्दारी करणार्या आमदारांवर कारवाई होत नाही, अशी खंत व्यक्त करत नामोल्लेख टाळत गांधी घराण्यासह काँग्रेस पक्षातील कार्यपद्धतीवर टीका केली होती.
त्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मागील आठवड्यात नवी दिल्ली येथे महागाई विरोधात एल्गार पुकारण्यात आला होता. यावेळी झालेल्या पदयात्रेचे जाहीर सभेत आ. चव्हाण हे सहभागी होणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते.
हे ही वाचा : बच्चू कडूंच्या वकिलांवर न्यायाधीश भडकले, पण…., अखेर जामीन मंजूर
या आंदोलनात सहभागी होत आ. चव्हाण यांनी प्रमाणात तर्कवितर्कांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता. गुलाम नबी आझाद यांचीही त्यांनी भेट घेतल्याचे वृत्त समोर आले होते.