मुंबई, 14 जुलै : वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना (Prisoners) तुरुंगात (Jail) मिळणाऱ्या अन्नाचा दर्जा (Food quality) सुधारण्याचा निर्णय तुरुंग प्रशासनानं (Jail administration) घेतला आहे. चिकन, मटन आणि रेस्टॉरंटमधील इतर पदार्थांसारखे चमचमीत पदार्थ तुरुंगातही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे आरोग्याचं संवर्धन कऱण्यासाठी गरजेचे असणारे प्रोटीन बारसारखे पदार्थदेखील तुरुंगात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. महाराष्ट्र तुरुंग प्रशासनाचे अतिरिक्त महासंचालक सुनील रामानंद यांनी ही माहिती दिली आहे. अशी घेणार कैद्यांची काळजी मुंबईतील आर्थर रोड जेल लवकरच बहुमजली होणार असून कैद्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक तुरुंगात व्यवस्था सुधारली जाणार असल्याचं रामानंद यांनी सांगितलं आहे. तुरुंगातील आहारामध्ये यापूर्वीच सुधारणा करण्यात आली असून त्यामुळे पॅरोल मिळालेल्या 55 कैद्यांनी तो घेण्यास नकार दिल्याचं ते म्हणाले. घरापेक्षा तुरुंगात अधिक चांगलं जेवणं आणि सुविधा असल्यामुळे आपल्याला घरी जाण्याची इच्छा नसल्याचं कैद्यांनी सांगितलं, असं सुनील रामानंद यांनी म्हटलं आहे. कोरोना काळातील आव्हान राज्यात कोरोनाची पहिली लाट येण्यापूर्वी 60 तुरुंगांमध्ये असणाऱ्या कैद्यांची संख्या ही क्षमतेपेक्षाही अधिक होती. क्षमतेच्या 152 टक्के कैदी तुरुंगात होते. आतापर्यंत 4243 कैद्यांना कोरोना झाला असून त्यापैकी 4157 कैदी बरे झाले आहेत. कोरोना काळात 13,115 कैद्यांना पॅरोलवर घरी सोडण्याचा निर्णय तुरुंग प्रशासनानं घेतला होता. त्यामुळे तुरुंगातील कैद्यांची संख्या कमी झाली होती. हे वाचा - राज्यात पावसाचा जोर कायम; मुंबईसह 12 जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट तुरुंग बनले कोविड सेंटर कैद्यांना घरी पाठवल्यामुळे रिकाम्या झालेल्या तुरुंगाचा वापर कोविड सेंटर म्हणून करण्यात आला. यामुळे अनेक रुग्णांना वाचवण्यात यश आलं असून कोरोना काळात तुरुंगाच्या जागेचा योग्य उपयोग झाल्याबद्दल समाधान वाटत असल्याचं रामानंद यांनी सांगितलं आहे. सध्या सर्व तुरुंगात मिळून 73 ऍक्टिव्ह कोरोना केसेस आहेत, तर 13 कैदी आणि 10 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.