लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी
नाशिक, 08 जानेवारी : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची (gram panchayat election 2021)रणधुमाळी सुरू आहे. तिन्ही पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली आहे. तरदुसरीकडे नाशिकमध्ये (Nashik) शिवसेना भाजपला (BJP) जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे. भाजपचे दोन मोठे नेते शिवसेनेच्या (Shivsena) गळाला लागले आहे. आज संध्याकाळी या दोन्ही नेत्यांचा सेनेत प्रवेश होण्याची शक्यता आहे.
मागील महिन्यात 21 डिसेंबर रोजी माजी आमदार बाळासाहेब सानप(Balasaheb Sanap) यांनी शिवसेनेला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्याचा बदला म्हणून शिवसेनेनं दोन भाजपच्या नेत्यांना आपल्या गळाला लावले आहे. माजी आमदार वसंत गीते आणि भाजप प्रदेशउपाध्यक्ष सुनील बागुल शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे, या दोन्ही नेत्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, अशी माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीला नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे आणि युवासेनेचे नेते वरूण सरदेसाई देखील उपस्थित होते.
सुनील बागुल आणि वसंत गीते दोनही नेते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची आज पुन्हा घरवापसी होणार आहे. परंतु, या दोन्ही नेत्यांची घरवापसी जरी असली तरी भाजपला हा मोठा धक्का समजला जात आहे.
विशेष म्हणजे, माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेला धक्का मानला जात होता. परंतु, सानप यांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे भाजपमध्येच फूट पडल्याचे पाहण्यास मिळाले होते.
भाजपमधील अनेक नेत्यांनी सानप यांना भाजपमध्ये पुन्हा प्रवेश देऊ नये अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. पण, सर्वांचा विरोध डावलून सानप यांना पक्षात घेण्यात आले होते. सानप यांच्या घरवापसीमुळे नाशिक, धुळे जिल्ह्यातील शेकडो भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले आहे.
सानप यांच्या भाजप प्रवेशाचा बदला घेण्यासाठी आता शिवसेनेनं रणनीती आखली आहे. आता या दोन्ही नेत्यांसोबत अनेक कार्यकर्तेही सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.