अनिस शेख, लोणावळा, 19 मार्च : मुंबई-पुणे महामार्गावर दुचाकीचा अपघात (Accident on Mumbai Pune Highway) झाल्याबाबतची माहिती लोणावळा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने घटनास्थळावर दाखल होत अपघाताची पाहणी केली असता तो अपघात नसून घातपात असल्याबाबतचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार या घटनेची आजूबाजूला पोलिसांनी चौकशी केली असता चारचाकी वाहनाने दुचाकीस्वाराला मागून जोरदार धडक देऊन तो लोणावळ्याच्या दिशेने पसार झाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार क्षणाचाही विलंब न करता पोलीस निरीक्षक मुजावर यांनी शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले.
नाका-बंदी दरम्यान एक मारुती 800 कार पोलिसांना संशयास्पद आढळून आली. त्या वाहन चालकाला पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने आपले नाव रामदास ओझरकर असं सांगितलं. त्याच्याजवळ असलेली कार ही समोरील बाजूने अपघातग्रस्त असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने त्याविषयी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता रामदास याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता पूर्ववैमनस्यातून भांडण झाल्याचा राग मनात धरून रामदास याने त्याच्याकडे असलेल्या मारुती 800 कार वरून भाजे गावाच्या हद्दीतून लोणावळ्याच्या दिशेने दुचाकीवरून जाणाऱ्या सतीश ओझरकर यास पाठीमागून जोरदार धडक दिली असल्याचे सांगितले.
दुचाकीवरून खाली पडलेल्या सतीश यास रामदास याने त्याच्याजवळ असलेल्या लोखंडी रॉडने डोक्यावर तसंच अंगावर बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. गंभीर जखमी झालेल्या सतीशला महामार्गावर सोडून रामदासने लोणावळ्याच्या दिशेने पळ काढला. महामार्गावर सतीशला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला असा बनाव आरोपी रामदास याने आखला होता. परंतु पोलिसांच्या वेगवान तपासामुळे त्याचं बिंग फुटलं आणि अवघ्या तासाभरातच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आरोपी रामदासच्या हातात बेड्या ठोकल्या.
हेही वाचा - नातवानेच केला घात, 68 वर्षीय आजोबांच्या डोक्यात कोयत्याने वार करत केला खून
संबंधित घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सतीश याचा रामदासने धडक देउन मारहाण करत खून केला असल्याबाबतची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती कार तसंच लोखंडी रॉड पोलिसांनी जप्त केला आहे. घटनेचा आधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, सदर कामगिरी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनीत कावत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस हवलदार जिवराज बनसोडे, शकील शेख, पोलीस नाईक देविदास चाकणे, मयुर अबनावे, पो.शी. ऋषिकेश पंचरास, सिद्धेश शिंदे, हणमंत शिंदे, स्वप्नील पाटील, मच्छिंद्र पानसरे यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai pune expressway