धुळे, 19 मार्च : जुन्या वादातून चुलत नातवानेच आजोबांच्या डोक्यात कोयता घालून त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना धुळे जिल्ह्यातील (Dhule grandfather murder case) वार गावात घडली आहे. आजोबांचा खून करून आरोपी नातू फरार झाला आहे.
धुळे तालुक्यातील वार गावातील 68 वर्षीय आत्माराम हिरामण पारधी यांचा चुलत नातवानेच घात केला. पूर्व वैमनस्यातून हा खून झाला असून याप्रकरणी आरोपीविरोधात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे तालुक्यातील वार गावातील आत्माराम पारधी असं या मयत आजोबांचं नाव असून त्यांचा चुलत नातू ज्ञानेश्वर पारधी याने भरदिवसा जुन्या कौटुंबिक वादातून आत्माराम यांच्या डोक्यावर धारदार कोयत्याने वार करत त्यांचा खून केला.
आजोबा आत्माराम पारधी हे पत्नी, चार मुलगे व सुनांसह वार गावातच राहतात. गावातच त्यांच्या घराजवळ त्यांचा चुलत नातू ज्ञानेश्वर पारधी राहतो. नेहमीप्रमाणे ज्ञानेश्वर हा आजीकडे आला. यावेळी ज्ञानेश्वरने कौटुंबिक वादाची कुरापत काढून शेजारीच असलेल्या आत्माराम पारधी यांच्याशी वाद घातला. त्यांनंतर भडकलेल्या ज्ञानेश्वरने आपल्या हातातील कोयत्याने थेट आत्माराम पारधी यांच्या डोक्यावरच वार केले. यामुळे आत्माराम पारधी गंभीर दुखापत होऊन रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळले. अधिक रक्तस्त्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा - पुण्यात आता गुंडांची खैर नाही, पोलीस स्टेशनकडून आजपासून अनोखा उपक्रम!
कौटुंबिक जुना वाद तसंच कुटुंबाच्या आणि समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात समाविष्ट करून घेतले जात नसल्याने ज्ञानेश्वरच्या मनात राग होता. त्यामुळे त्याने हा खून केला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. आरोपी हा मयत आत्माराम पारधी यांचा चुलत नातू आहे. घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, या घटनेनंतर ज्ञानेश्वर हा गावातून पसार झाला असून पश्चिम देवपूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Dhule