मुंबई, 9 नोव्हेंबर : शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी ईडीच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, पण न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध ईडीने हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टात न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर 4.30 वाजता सुनावणी होणार आहे, त्यामुळे संजय राऊत घरी जाणार का पुन्हा जेलमध्ये जाणार, याचा निर्णय 4.30 वाजता होणार आहे. संजय राऊत यांच्या जामिनाला विरोध करण्यासाठी अटर्नी जनरल अनिलसिंग हायकोर्टात गेले आहेत. ईडीच्या कोर्टाने दिलेल्या जामिनाला स्थगिती द्यावी, यासाठी ईडीचे वकील हायकोर्टात दाखल झाले आहेत. ईडीने जामीन दिल्यानंतर संजय राऊत पुन्हा आर्थर रोड जेलच्या दिशेने रवाना झाले आहेत. संजय राऊत यांच्यासोबत प्रविण राऊत यांनाही कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. या दोघांनीही जातमुचलक्याची रक्कम कोर्टात भरली आहे. संध्याकाळी 4.30 वाजता सुनावणी होणार असल्यामुळे हायकोर्टाने जरी राऊतांना जामीन दिला तरी ते आज जेलबाहेर येणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. जेल प्रशासनाचं दिवसाचं काम संपण्याआधी कोर्टाच्या आदेशाची प्रत आर्थर रोड कारागृहाच्या पेटीत टाकली जाणार का? यावर संजय राऊतांना जामीन मिळणार का नाही, हे ठरणार आहे. मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकू नये याकरता मोटरसायकलवर रायडरला कोर्ट ऑर्डर घेऊन आर्थर रोड जेलमध्ये जाण्यासाठी तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.