कोल्हापूर, 25 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 8 वाजता देशभरात लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली. यावेळी पंतप्रधानांनी 'कोरोना' (Coronavirus) म्हणजे 'कोई रोड पे ना आये' असा सविस्तर अर्थ सांगितला. कोरोनाची कलात्मक व संदेशरुपी फोड करणारा पठ्ठ्या हा कोल्हापूरातील (Kolhapur) आहे. पंतप्रधानांनी संपूर्ण देशासमोर त्याची कलाकृती दाखवत त्याच्या कलेला प्रोत्साहन दिलं आहे.
कोल्हापूर ही कलेची नगरी असल्याचं म्हटलं जातं. इथले कलाकार वास्तवता दाखवण्यात नेहमी अग्रेसर असल्याचं या उदाहरणावरुन समोर आलं आहे. कोल्हापूरच्या विकास डिगे या कलाकाराने कोरोनाची भयंकर परिस्थिती अगदी सोप्या शब्दात दाखविणारा आणि रस्त्यावर फिरु नका असं सांगणारा 'कोई रोड पे ना आये' आशयाचे एक रेखाकट फेसबुकवर शेअर केले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या डिझाइनचा दाखला देत या कलाकाराचे कौतुक केले आणि हे डिझाइन संपूर्ण देशाला दाखवून घराबाहेर पडू नको असं आवाहन केलं.
संबंधित - 'नवऱ्यांना 21 दिवसांत पोळ्या लाटायला शिकवा, बाहेर आले तर आम्ही आहोतच'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री लॉकडाऊन जाहीर करताना केलेल्या भाषणादरम्यान नागरिकांना 21 दिवस घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. त्यावेळी मोदींनी भाषणादरम्यान हे डिझाइन सुद्धा आवर्जून दाखवले. आणि यामध्ये लिहिल्याप्रमाणे कोणीही रस्त्यावर येऊ नका अशी कळकळीचं आवाहन केलं. कोल्हापूरच्या विकास सदानंद डिगे याने हे डिझाइन रेखाटलं आहे. कोरोनाचा भयानक कहर पाहून देशातील नागरिकांना सजग करणारे बोलके 'कोई भी रोड पे ना आये' या आशयाचे रेखाटन विकास ने 22 मार्च रोजीच्या जनता कर्फ्युच्या दिवशी फेसबुकवर (Facebook) शेअर केले होते.
त्यावेळी क्षणार्धात कित्येक नेटकऱ्यांनी हे त्याचे रेखाटन लाईक करून आपापल्या वॉलवर शेअर केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा विकासचे हे कोरोना विरोधात नागरिकांना दिशा देणारे चित्र आवडल्यामुळे त्यांनी त्याचे दूरचित्रवाणीवरुन तोंडभरून कौतुक केले आणि तेच रेखाटन दाखवित नागरिकांनी पुढील 21 दिवस घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले. विकास याने कोल्हापूरच्या कलानिकेतनमधून कमर्शियल आर्टची पदवी घेतली असून गेली सात वर्षे तो ऍड टुमारो ॲडव्हर्टायजिंग स्टुडिओ ही जाहिरातविषयक कंपनी चालवत आहे.
संबंधित - हातावर पोट असणाऱ्यांना आता Parle G चा आधार, कंपनी वाटणार 3 कोटी पॅकेट्स
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.