मुंबई, 16 सप्टेंबर : पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊतांविरोधात ईडीने पुढचं पाऊल टाकलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केलं आहे. पत्राचाळ प्रकरणात इडीने पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रामध्ये संजय राऊत यांचा घोटाळ्यात सहभाग असल्याचा पुरावा आहे, असा दावा करण्यात आला आहे. 15 सप्टेंबरला इडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती इडीने दिली आहे. दरम्यान संजय राऊत प्रकरणात आज दिवसभर वेगवान घडामोडी घडल्या आहेत. इडीने कोर्टामध्ये संजय राऊत यांच्या अटकेला विरोध केला आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांच्या जामिनाबाबत कोर्टाने इडीला उत्तर द्यायला सांगितलं होतं. इडीने कोर्टापुढे हे उत्तर सादर करत संजय राऊत यांच्या जामिनाला विरोध केला आहे. या पत्रामध्ये इडीने काही महत्त्वाचे दावे केले आहेत. पत्राचाळ आर्थिक घोटाळ्यात संजय राऊत सहभागी असल्याचा पुरावा आहे. 1039 कोटी 79 लाखांच्या पत्राचाळ घोटाळ्याचा तपास हा अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहे, असं इडीने कोर्टाला सांगितलं आहे. संजय राऊत यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे पुरावे आहेत, त्यामुळे अधिक सखोल तपास करायचा आहे, असं इडीने 8 ऑगस्टला सांगितलं होतं. या व्यवहारात 1 कोटी 6 लाख आणि 1 कोटी 17 लाख ही रक्कम खात्यात मिळाल्याचा पुरावा आहे, पण ही रक्कम संशयास्पद असल्याचा इडीचा दावा आहे. संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातील 1 कोटी 8 लाखांचं ट्रान्झाक्शन संशयास्पद असल्याची माहिती ईडीने कोर्टाला दिली आहे. या दोघांच्या व्यवहार तपासणीत अनेक संशयास्पद ट्रान्झाक्शन सापडले आहेत. संजय राऊत हे प्रभावशाली राजकीय व्यक्तीमत्व असल्यामुळे तपासाता आणि साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतात. या प्रकरणात एका महिला साक्षीदाराने संजय राऊ यांनी धमकी दिल्याचा आरोप केला आहे, त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत त्यांना जामीन देण्यास इडीने विरोध केला आहे. 5 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत कोर्टाने संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 19 सप्टेंबरपर्यंत वाढ केली होती. यानंतर राऊतांनी 7 सप्टेंबरला जामीनासाठी अर्ज केला. राऊतांच्या जामीन अर्जावर 16 सप्टेंबरपर्यंत उत्तर द्या, असे आदेश कोर्टाने इडीला दिले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.