पंढरपूर, 2 मे : राज्यात अटीतटीच्या झालेल्या पंढरपूर पोटनिवडणुकीत (Pandharpur Bypoll) अखेर भाजपच्या समाधान (Samadhan Awtade) आवताडेंचा विजय झाला आहे. त्यांनी भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा 3733 मतांनी पराभव केला. महाविकास आघाडी (MVA) विरुद्ध भाजप (BJP) अशी ही निवडणूक दोन्ही बाजुंनी प्रतिष्ठेची बनवली होती. पण भाजपच्या नेत्यांनी खेळलेला डाव एवढा तंतोतंत योग्य ठरला की भाजपनं विजयाला गवसणी घातली आणि राष्ट्रवादीला (NCP) पराभवाला सामोरं जावं लागलं. (वाचा- ‘योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम होईल’, देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान ) आमदार भारत भालके यांच्या कोरोनामुळं झालेल्या निधनानंतर पंढरपूरची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी भाजपचे समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांनी शक्ती पणाला लावली. राष्ट्रवादीबरोबरच शिवसेना आणि काँग्रेसनंही जोरदार प्रचार केला. भालके यांच्या निधनानंतर सहानुभुतीचा फायदा होईल असंही महाविकास आघाडीला वाटत होतं. पण तसं झालं नाही. उलट भाजपनं खेळलेली खेळी या सर्वावर भारी पडली असं म्हणावं लागेल. (वाचा- पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, ममतादीदी नंदीग्राममधून पराभूत ) भाजपनं या निवडणुकीत एकिच बळ किती महत्त्वाचं असतं हे दाखवून दिलं. पंढरपूर किंवा सोलापुरात भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांचे दोन गट समजले जातात. ते म्हणजे परिचारक आणि आवताडे गट. या दोन्ही गटांनी एकत्रितपणे पूर्ण शक्ती पणाला लावली तर विजय शक्य असल्याचा अंदाज भाजपच्या नेतृत्वाला होता. त्यामुळं निवडणुकीपूर्वी या दोन्ही गटांची दिलजमाई करण्यात आली. त्याचा फायदाही पाहायला मिळाला. प्रशांत परिचारक यांनी आवताडे यांच्या विजयासाठी प्रचंड परिश्रम घेतले. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे रणजीतसिंह मोहिते पाटील, चंद्रकांत पाटील यांनीही पूर्ण ताकदीनं प्रचार केला आणि त्याचा चांगला परिणाम पाहायला मिळाला. या निवडणुकीत काट्याची टक्कर झाली असली तर सहानुभुतीचा फायदा मिळण्याची शक्यता असतानाही मिळवलेला विजय हे भाजपचं मोठं यश ठरलं आहे. यासाठी भाजपच्या नेत्यांनी आखलेली रणनिती अगदी योग्य ठरल्याचं पाहायला मिळालं. तसंच दोन बड्या नेत्यांचे गट एकत्र आल्यानं जिल्ह्यात पक्षाला आणखी बळकटी मिळणार हेही स्पष्ट आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







