वीरेंद्रसिंह उत्पात, पंढरपूर, 4 फेब्रुवारी : वाळू चोरांवर कारवाईसाठी गेलेल्या करकंब पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांवर 5 जणांनी दगडफेक करीत जखमी केल्याची घटना शनिवारी (दि.१) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पेहे येथे घडली आहे. याप्रकरणी एकूण 7 जणांविरूध्द सरकारी कामात अडथळा आणि वाळू चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
ट्रॅक्टर चालक विनायक महादेव भोसले, किशोर महादेव भोसले (रा.कोंढारपट्टा, ता.माळशिरस) आणि इतर अनोळखी 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, पोलीस नाईक सूळ, भोसले व फुगे हे शनिवारी रात्री खासगी वाहनाने गस्त घालत होते.
या दरम्यान, पेहे येथील नदीपात्रातून वाळू चोरी सुरू असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्यानुसार खात्री करण्यासाठी सहा.पोलीस निरीक्षक पाटील यांनी पोलीस नाईक सूळ व भोसले या दोघांना मोटारसायकलवरून पाठवून दिले. पेहे हद्दीतील अण्णा भोसले यांच्या शेताजवळील भीमा नदीपात्रात एक ट्रॅक्टर आणि डंपींग ट्रेलरच्या सहाय्याने वाळू चोरी सुरू असल्याचे त्यांना दिसून आले.
बाहेरून आलेल्या गुंडांचा पिंपरी चिंचवड परिसरात हैदोस, सोसायटी अध्यक्षाला बेदम मारहाण
पोलिसांनी तात्काळ सदर ट्रॅक्टर पकडून त्यामधील विनायक भोसले आणि किशोर भोसले या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याचवेळी अनोळखी ५ जण तेथे आले. त्यांनी 'ट्रॅक्टर सोडून द्या, नाहीतर तुमचे काही खरे नाही', असे म्हणत पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये पोलीस नाईक सूळ व भोसले हे दोघे जखमी झाले. यादरम्यान अंधाराचा फायदा उठवत सर्वजण ट्रॅक्टरसह पसार झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pandharpur