नाशिक, 20 एप्रिल : पालघरमधील साधू हत्या प्रकरण तापलं असून देशातील सर्व आखाड्यांची परिषद मैदानात उतरली आहे. 'महाराष्ट्रातील संत असुरक्षित आहेत. सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे. या हत्याकांडात पोलीस देखील जबाबदार आहेत. संपूर्ण गावाला सील करून गावाची हत्या करावी,' अशी संतप्त प्रतिक्रिया अखिल भारतीय आखाडा परिषद अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी दिली आहे.
'महंतांची हत्या करणारे राक्षसच. त्यामुळे त्यांचा वध करण चुकीचं नाही. लॉकडाऊननंतर लाखो नागा साधूंना घेऊन त्या गावाला आणि सरकारला घेरणार आहोत. देशातील सर्व आखाड्यांचे महंत संतप्त झाले आहेत. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास सरकारच्या विरोधात तिथेच मोठं आंदोलन उभारणार आहोत. महाराष्ट्र ही संतांची भूमी मानली जाते. मात्र आता महाराष्ट्रात साधू संत सुरक्षित नाही,' अशा आक्रमक शब्दांमध्ये महंतांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
पालघरमध्ये नेमकं काय घडलं?
पालघरमधील दाभाडी-खानवेल मार्गावर नाशिककडून येणाऱ्या एका वाहनाला ग्रामस्थांनी रोखलं होतं. या प्रवाशांची विचारपूस पूर्ण ऐकून घेण्याच्या आतच ग्रामस्थांनी दगडफेक करायला सुरुवात केली. या मारहाणीमध्ये चालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहोचला होता. संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक केली.
हेही वाचा- महाराष्ट्रापुढे कोरोना संकट वाढले, रुग्णांची संख्या 4483 वर
काय आहे गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया?
पालघर येथे दोन साधू आणि त्यांच्या चालकाची जमावाकडून हत्या झाल्यानंतर राजकीय वातावरणही तापलं आहे. या मुद्द्यावरून भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. त्यानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या मुदद्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'पालघर येथील घडलेली घटना ही अतिशय दुर्देवी असून या घटनेचे कुणीही राजकारण करू नये, असं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अकोल्यात पत्रकार परिषदमध्ये केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.