पालघर, 15 मे : शिवसेना आणि भाजपच्या जागावाटपात पालघरची जागा कुणाला मिळणार यावरून बराच खल झाला. 2014 च्या निवडणुकीत इथे एकत्र लढलेले शिवसेना आणि भाजप 2018 च्या पोटनिवडणुकीत मात्र आमनेसामने आले.
पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे इथे पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत भाजपचे राजेंद्र गावित विजयी झाले आणि शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा पराभव झाला. श्रीनिवास वनगा हे चिंतामण वनगा यांचा मुलगा आहेत.
पोटनिवडणुकीत सेनेचा पराभव
पालघरच्या पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाल्यामुळे या लोकसभा निवडणुकीत ही जागा कुणाकडे जाणार यावरून वाद होता. अखेर ही जागा शिवसेनेकडे आली पण भाजपमधून शिवसेनेत आलेले राजेंद्र गावित यांना इथून उमेदवारी देण्यात आली.
पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीने बळीराम जाधव यांना यावेळी उमेदवारी दिली. बळीराम जाधव हे 2009 चे पालघरचे खासदार आहेत.
मागच्या निवडणुकीत भाजपचा विजय
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार चिंतामण वनगा इथून निवडून आले. त्यांनी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा पराभव केला होता.
2018 च्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांना 2 लाख 72 हजार 782 मतं मिळाली तर शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांना 2 लाख 43 हजार 838 मतं मिळाली.
पालघरमध्ये विजय कुणाचा ?
पालघर लोकसभा मतदारसंघात डहाणू आणि विक्रमगड हे विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत. पालघर शिवसेनेकडे आहे तर बोइसर, नालासोपारा आणि वसई बहुजन विकास आघाडीकडे आहे.
या निवडणुकीत युती असलेल्या भाजप शिवसेनेला पालघरची प्रतिष्ठेची जागा मिळते का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
====================================================================================
VIDEO : अहमदनगरच्या तरुणाचा दिल्लीतील काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत राडा