परमेश्वर सोनवणे, प्रतिनिधी उस्मानाबाद, 4 फेब्रुवारी : महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती ही वेगवेगळ्या पदार्थांनी नटली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तुम्हाला तेथील विशेष स्थानिक पदार्थ खायला मिळतील. राज्यात अनेक ठिकाणी उत्तम दर्जाचे गुलाबजाम मिळतात. पण, उस्मानाबादच्या ताज हॉटेलमधील गुलाबजाम खाल्लेला व्यक्ती याच्या प्रेमात पडतो. त्यामुळेच इथं गुलाबजाम खाण्यासाठी बाहेरगावच्या मंडळीसोबतच नियमित येणाऱ्या स्थानिकांचीही गर्दी असते. काय आहे खासियत? उस्मानाबादमधील ताजच्या गुलाबजामची खासियत म्हणजे आकाराला थोडे मोठे, लांबट गोल आकाराचे आहेत. अगदीच हलके आणि नाजूक असलेले गुलाबजाम प्लेटमध्ये समोर आल्यावर कधी तोंडात टाकतोय असं प्रत्येकाला होतं. हे गुलाबजाम चांगलेच नरम असतात. त्यामुळे चमच्यानं स्पर्श करताच त्याचा तुकडा सहज पडतो. त्यामध्ये पाकही मस्त मुरलेला असतो. पन्नास साठच्या दशकात शहरात राजस्थानातून आलेल्या सिंधी दुर्बिनचे गुलाबजाम प्रसिद्ध होते. नेहरू चौकात असणाऱ्या दुर्बिनच्या या हॉटेलमधील गुलाबजामची त्या काळातील राजकीय नेते, कलाकार, साहित्यिक यांनाही भुरळ पडली होती. दुर्बिन हॉटेलची हीच परंपरा ताज हॉटेलनं गेल्या साडेतीन दशकांपासून सांभाळली आहे. घरगुती पद्धतीचं बीडचं फेमस आईस्क्रीम! बाराही महिने असते ग्राहकांची गर्दी, Video हॉटेल ताजचे मालक ताजुद्दीन शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘त्यांनी 1978 साली हे दुकान सुरू केलं. सध्या त्यांची तिसरी पिढी हा व्यवसाय करत आहे. आम्ही अगदी नैसर्गिक पद्धतीनं गुलाबजाम तयार करतो. गुलाबजाम तयार करण्यासाठी आम्ही पारंपारिक पद्धत आजही वापरतो. त्यामुळे ग्राहकांना त्याची चव जास्त आवडते.’ एका लांबट गुलाबजामचे वजन साधारण 50 ग्रॅम इतकं आहे. हे तेलात तळताना सर्व गोळ्यांना तपकिरी रंग आला पाहिजे याची विशेष काळजी घेतली जाते. त्याचबरोबर तो साखरेच्या पाकात बुडवून ग्राहकांच्या प्लेटमध्ये दिला जातो. गुलाबजामसोबतच येथीाल पाकाची चव देखील खास आहे.
किती आहे किंमत? एक किलो गुलाबजामध्ये साधारण 20 गुलाबजाम आणि पाक येतो. त्याची किंमत 180 रुपये इतकी आहे. या हॉटेलमध्ये रोज 40 ते 50 किलो खवा लागतो, अशी माहिती येथील आचाऱ्यानं दिली आहे. गुलाबजामसोबतच पेढे आणि अन्य गोड पदार्थांचीही या हॉटेलमध्ये विक्री होते, असं मालक ताज शेख यांनी सांगितलं.
गुगल मॅपवरून साभार
कुठे खाणार? हॉटेल ताज, उस्मानाबाद बसस्टँडच्या समोर, उस्मानाबाद संपर्क क्रमांक - 9172041616