उस्मानाबाद, 1 ऑक्टोबर : अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतून राजकारणात एण्ट्री घेतली, पण पहिल्याच निवडणुकीत पार्थ पवार यांना पराभवाचा धक्का बसला. मावळ मतदारसंघातून शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांना पराभवाची धूळ चारली. पवार कुटुंबातल्या व्यक्तीचा निवडणुकीतला हा पहिलाच पराभव होता. यानंतर आता पार्थ पवार यांनी पुन्हा रिंगणात उतरावं, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्याकडूनच करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांनी अजित पवारांसमोरच पार्थ पवार यांना मैदानात उतरवण्याची मागणी केली. जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी संपत चालली आहे. तानाजी सावंत आणि राणा जगजित सिंह पाटील यांच्या विरोधातील आघाडीचं नेतृत्व पार्थ पवार यांनी करावं, म्हणजे राष्ट्रवादीला यश येईल, असा विश्वास सुरेश पाटील यांनी व्यक्त केला. दादांचा सावंतांवर निशाणा याच कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला. काही लोकांनी तर मराठा समाजाची खाज काढली, त्यांच्या घरचं आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवार यांनी विचारला. भाच्यावर टीकास्त्र अजित पवार यांनी त्यांचे भाचे राणा जगजित सिंह पाटील यांच्यावरही निशाणा साधला. ‘राणा पाटलाला अवदसा सुचली आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडली, त्याला काय कमी केलं होतं,’ असं अजित पवार म्हणाले. काय आहे नातं? पद्मसिंह पाटील आणि पवार कुटुंब यांच्यात जवळचं नातं आहे. पद्मसिंह पाटील यांच्या बहिण सुनेत्रा पवार यांचं अजित पवारांशी लग्न झालं आहे. राणा जगजितसिंह हे पद्मसिंह पाटील यांचे पूत्र आहेत. 2019 निवडणुकीआधी राणा जगजितसिंह यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पद्मसिंह पाटील हे बराच काळ शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे होते. पद्मसिंह पाटील आणि शरद पवार यांच्या या जवळीकीचं रुपांतरच नंतर पाटील-पवार कुटुंबियांच्या नात्यात झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.