परमेश्वर सोनवणे, प्रतिनिधी
उस्मानाबाद, 8 फेब्रुवारी: उन्हाळ्याची चाहूल लागली की बाजारात मोठ्या प्रमाणात द्राक्षे दिसू लागतात. नोव्हेंबर डिसेंबरमध्येच द्राक्षांचा हंगाम सुरू होतो. आंबट गोड द्राक्षे आवडत नाहीत असा माणूस अपवादानेच आढळेल. उस्मानाबादमध्येही फळबाजार द्राक्षांनी फुलले असून रस्त्यावरही द्राक्षांचे ठेले दिसत आहेत. व्यापारी आणि शेतकरीही द्राक्षे विकत असून खरेदीसाठी ग्राहकही रस दाखवत आहेत.
उस्मानाबादमध्ये द्राक्षांच्या किरकोळ विक्रीचे दर हिरवी द्राक्षे 80 रु. किलो आणि काळी द्राक्षे 120 रु किलो आहेत. तर बाजारातील द्राक्षे विक्रीचे दर हिरवी द्राक्षे 60 रुपये आणि काळी द्राक्षे 100 रु प्रतिकिलो आहेत.
द्राक्ष खाण्याचे फायदे:
फळ म्हणून द्राक्षे सर्वांना आवडत असली तरी ते खाण्याचेही काही फायदे आहेत.
1. द्राक्षाने रक्तदाब नियंत्रित राहतो. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी आठवड्यातून तीन-चार वेळा द्राक्षाचे सेवन करा.
2. मायग्रेनचा त्रास होणा-यांना द्राक्षांचा रस फायदेशीर ठरेल.
3. द्राक्षांमध्ये कॅल्शिअम असल्यामुळे हाडे मजबूत होतात.
4. द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन 'ई' जीवनसत्व असल्यामुळे केस गळणे आणि केस पांढरे होणे यांसारख्या समस्या दूर होतात.
5. द्राक्ष खाल्ल्याने लघवीच्या वेळी होणा-या वेदना आणि जळजळ कमी होते.
6. द्राक्षामुळे पित्त, अपचन यांपासून आराम मिळतो.
कधी पाहिलाय का गुलाबी अन् पिवळी फ्लॉवर; छत्तीसगडच्या शेतकऱ्यांनं केलीये कमाल
द्राक्षे कोणत्या वेळी खावीत?
नेहमी सकाळी द्राक्षे खावीत. जर तुम्ही सकाळी याचे सेवन केले तर त्यात जास्त प्रमाणात असलेले पाणी तुम्हाला डिहायड्रेट होण्यापासून प्रतिबंधित करते. यासोबतच यामध्ये असलेली साखर तुम्हाला ऊर्जा देते आणि तुमची पचनसंस्था निरोगी राहते.
द्राक्षे खाताना घ्यावयाची काळजी
बाजारातून द्राक्षे आणल्यानंतर ती तशीच खाऊ नयेत. द्राक्षांवर औषधे मारल्यामुळे ते धोकादायक ठरू शकते. त्यासाठी काही वेळ ती पाण्यात भिजत ठेवावी. मिठाच्या पाण्यात ठेवणेही उत्तम राहील. ज्यामुळे त्यावर मारलेली औषधे तुमच्या शरीरात जाणार नाहीत व आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Local18, Osmanabad