मुंबई, 07 फेब्रुवारी : शेतीमध्ये सध्या अनेक प्रयोग केले जात आहेत. शेतकरी शेतीतलं अधिक शिक्षण घेऊन जास्त नफा मिळवण्यासाठी प्रयोग करत आहेत. नेहमीच्या भाज्यांना व पिकांना फारसं मूल्य मिळत नसल्यानं त्यात काही वेगळं करता येईल का यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नात असलेल्या छत्तीसगडमधल्या एका शेतकऱ्याने रंगीत फ्लॉवरचं पीक घेऊन भरपूर नफा कमावला आहे. सोशल मीडियावर त्याच्या रंगीत फ्लॉवरची खूप चर्चा झाल्यामुळे त्याला चांगला भाव मिळाला व नफाही झाला.
आतापर्यंत फ्लॉवर केवळ पांढऱ्या रंगाचा आपण पाहिलाय. फ्लॉवरसारखी दिसणारी ब्रोकोली हिरव्या रंगाची असते; मात्र पिवळ्या किंवा गुलाबी रंगाचा फ्लॉवर कधी पाहिलाय का? नसेल पाहिला तर आता पाहिल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण छत्तीसगडमधल्या जांजगीर-चांपा जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं त्याच्या शेतात पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या फ्लॉवरचं पीक घेतलंय. जांजगीर-चापातल्या गोविंद गावातल्या गोविंद नावाच्या शेतकऱ्याने रंगीत फ्लॉवर पिकवल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात चर्चा होत आहे.
हेही वाचा - TCS ची नोकरी सोडून पठ्ठ्यानं सुरू केली शेती, आज करतोय लाखोंची उलाढाल
सुरुवातीला त्यांनी थोड्याच जमिनीवर त्या फ्लॉवरचं पीक घेतलं. त्यात यश मिळाल्यानंतर आता ते दीड एकरच्या जमिनीत रंगीत फ्लॉवरची शेती ते करत आहेत. त्यांच्या या रंगीत फ्लॉवरला चांगली मागणी आहे.
छत्तीसगडमधले गोविंद यांनी एमएससी आणि बीएड केलंय. त्यांच्या शिक्षणाचा उपयोग आता त्यांनी शेतीतही करायचं ठरवलंय. काही काळापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातून फ्लॉवरचं बियाणं आणून त्यांच्या शेतात लावलं होतं. आता रंगीत फ्लॉवरचं उत्पादन घेऊन ते दीड पट जास्त पैसे कमावत आहेत. शेतीत नवनवे प्रयोग करायला त्यांना आवडतं. त्यांच्या या प्रयोगशील वृत्तीमुळेच त्यांना कमाईचं साधन उपलब्ध झालंय.
त्यांच्या गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या फ्लॉवरचे फोटो सोशल मीडियावर येऊ लागले तेव्हा गोविंद जायसवाल यांच्या शेतीतल्या प्रयोगाची चर्चा होऊ लागली. यामुळे त्यांच्या उत्पादनाला प्रसिद्धी मिळाली. आता लोक हे रंगीत फ्लॉवर तिप्पट जास्त किंमत देऊन खरेदी करू इच्छित आहेत. गोविंद यांच्या म्हणणयानुसार, ते पांढरा फ्लॉवर 6 ते 7 रुपये प्रतिकिलो या किमतीनं ते विकत होते. आता हे रंगीत फ्लॉवर 80 रुपये प्रतिकिलो दरानेही विकत घेण्याची लोकांची तयारी आहे.
जांजगीर-चांपामधल्या डॉ. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, गुलाबी आणि पिवळ्या फ्लॉवरमध्ये अनेक पोषणमूल्यं असतात. कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक त्यात असतं. वृद्ध आणि गर्भवती स्त्रियांसाठी ते घटक खूप उपयुक्त असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18