उस्मानाबाद, 10 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) अनेक देशांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. भारताचेही कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र कोरोनाच्या या संकटात सर्वाधिक भरडला गेला तो गरीब, कष्टकरी आणि मजूर वर्ग. हातावरचे पोट असल्यामुळे लॉकडाऊन काळात अनेकांना एकवेळचं अन्न मिळण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकवेळ जेऊन कसबसं जीवनाचा गाडा पुढे ढकलण्याचं काम अनेक कुटुंब करत आहेत. सरकारकडून मदत देण्याचं काम सुरू असलं तरीही तळागाळापर्यंत ती पोहोचत नाही आहे. उस्मानाबादमधूनही अशी एक कहाणी समोर येत आहे की त्यामुळे नक्कीच डोळ्यात पाणी तरळेल.
(हे वाचा-कोरोनामुळे मुंबईत नियम आणखी कडक, पाळले नाहीतर होईल गुन्हा दाखल
लॉकडाऊनमुळे घरात अडकल्याने अनेकांसमोर समस्या निर्माण झाल्या आहेत. उस्मानाबादमधील एका विकलांग भाऊ-बहिणीच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. आमचाही किराणा संपलाय, आम्ही उपाशी आहोत, आम्हालाही धान्य द्या - अशी आर्त विनवणी त्यांनी त्याठिकाणच्या नगरसेवकाला केली. 'आमची आई आता या जगात नाही. तिने जाण्याआधी किराणा भरला होता, तो देखील संपला आहे. आता आम्ही दोघेच घरी आहोत. त्यामुळे जे काही शिल्लक आहे त्यातून एक दिवसाआड आम्ही खात आहोत.' असं मोडक्या तोडक्या शब्दात मांडत तिने सर्व कहाणी युवराज नळे यांना सांगितली. दुपारी 3 वाजताच्या सुमारास त्यांना मदतीसाठी फोन आला होता. त्यांनी तातडीने त्यांना मदत धाडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या मुलीचा भाऊ विकलांग आहे आणि ती सुद्धा थोड्या प्रमाणात विकलांग आहे. एका महिन्यापूर्वी या मुलीची आई वारली. त्यामुळे या बहिणभावावर उपासमारीची वेळ आली. फोन आल्यानंतर युवराज नळे यांनी त्यांच्या जेवणाचा प्रश्व सध्या मिटवला आहे. यानंतर ज्योती राजे निंबाळकर यांच्या माध्यमातून गहू, तांदूळ, शेंगदाणे, डाळ, मीठ, तेल हे साहित्य देखील पाठवण्यात आले आहे.
संपादन- जान्हवी भाटकर