हैदर शेख, चंद्रपूर 8 जुलै : चंद्रपूर जिल्ह्यात 3 वाघाच्या मृत्यूच्या घटनेने खळबळ उडालीय. चिमुर तालुक्यातील मेटेपार शेत शिवारात ही घटना उघडकीस आली. मृतांत एक वाघीण आणि 2 बछड्यांचा समावेश आहे. घटनास्थळी आसपास गायीचे मृत वासरू आढळले आहे त्यामुळेच वाघांवर विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. चिमूर वनपरिक्षेत्रातील शंकरपूर वनक्षेत्रातली ही घटना आहे. मेटेपार गावालगत असलेल्या नाल्याजवळ एक वाघीन आणि दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले. बछडे आठ ते नऊ महिन्याचे आहेत. मेटेपार गावालगत असलेल्या तलावाकाठी काही युवक जांभळं तोडण्यासाठी गेले असता त्यांना तेथे वाघिणीसह दोन बछडे मृतावस्थेत आढळले. त्यांनी तात्काळ ही माहिती शंकरपूरच्या पर्यावरणवादी मंडळाच्या वन्यजीवप्रेमीना दिली. VIDEO : ‘बारामतीत अजित पवारांचं काम जास्त, 2019 ला त्यांना हरवणं फक्त आशावाद’ कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, जवळच गायीचे एक वासरू मृतावस्थेत आढळून आले. या वासराचे दोन पाय तुटलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे या वाघिणीने व तिच्या बछड्यांनी या मृत वासराला खाल्ल्याने त्यांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त होतोय. हा भाग संपन्न वन्यजीवसंपदेचा आहे. ब्रह्मपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक कुलराज सिंग व वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. 2019 या वर्षात आतापर्यंत जिल्ह्यात 6 वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय.
VIDEO : ‘माझ्या मुलाला वाचवा’, नारायण राणेंनी माझ्याकडे विनंती केली; पण…
दरम्यान या 3 वाघांच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. या प्रकरणी घातपात किंवा शिकार झाली असल्यास सक्षम यंत्रणेद्वारे त्याचा तपास करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.अशा पद्धतीच्या घटनांची पुनरावृत्ती होवू नये यादृष्टीने आवश्यक खबरदारी व उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत.