मुंबई, 14 मार्च : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा भाजप, देवेंद्र फडणवीस तसंच एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली. तसंच याचिकाकर्त्या गौरी भिडे यांना 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ‘गौरी भिडे हा चेहरा आहे, याच्यामागचा मास्टर माईंड शोधला पाहिजे. हाच मास्टर माईंड मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही चालवतो,’ असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. ‘चिवल्या बिचवरचा नारायण राणे यांचा बंगला पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, मात्र कारवाई होत नाही. अतिक्रमण विभाग कामात असेल तर किरीट सोमय्या यांनी हातोडा घेऊन जावे, त्यांना पार्ट टाईम पेमेंट मिळेल’, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. फडणवीसांवर निशाणा ‘उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत घरोबा केला म्हणून त्यांनी हिंदुत्व सोडले, असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता नागालँडमध्ये एनसीपीसोबत आहेत, मग ते नकली हिंदू आहेत, त्यामुळे आता त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाच्या खूर्चीला लाथ मारली पाहिजे आणि पूर्णवेळ संघाचं काम केलं पाहिजे,’ अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळालं, यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने एनडीपीपीला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. नागालँडमध्ये एनडीपीपीला 25, भाजपला 12 जागांवर विजय मिळवला, तर राष्ट्रवादीने 7 जागा जिंकल्या. नागालँडमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी एनडीपीपी-भाजप युतीला पाठिंबा दिल्यामुळे आता तिकडे विरोधी पक्षच असणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.