ह.भ.प.निवृती महाराज वक्ते बाबा यांचं निधन, वारकरी संप्रदायावर शोककळा

ह.भ.प.निवृती महाराज वक्ते बाबा यांचं निधन, वारकरी संप्रदायावर शोककळा

राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा 2016-17 या वर्षाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते यांना देण्यात आला होता.

  • Share this:

पंढरपूर, 21 डिसेंबर :  वारकरी संप्रदायातील सर्वदर्शनाचार्य, भीष्माचार्य निवृती महाराज वक्ते बाबा(Nivruti Maharaj Wakte Baba) यांचं निधन झालं आहे. ते 89 वर्षांच्या होते.  शेगाव जवळच्या टाकळी मुळगावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे  वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

निवृती महाराज वक्ते बाबा यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावलेली होती.  उपचाराअंती आज त्यांची अल्पशा आजाराने प्राणज्योत मालवली. राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा 2016-17 या वर्षाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते यांना देण्यात आला होता.

ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1934 रोजी बुलडाणा येथे वारकरी कुटुंबात झाला. अवघ्या 9 व्या वर्षापासून त्यांनी कुटुंबियांच्या सोबतीने मुक्ताबाई आणि पंढरीची वारी सुरू केली. प्राथमिक शिक्षणाबरोबर संत साहित्याची विशेष आवड असल्याने त्यांनी बालवयातच अडीच हजार अभंगांचे पठण केले होते. 1994 ते 1958 या काळात त्यांनी साखरे महाराज मठात गुरू निलकंठ प्रभाकर मोडक यांच्याकडे अध्ययन केले. पुढे 1992 पर्यंत त्या काळातील थोर पंडित संत महात्मे, ह.भ.प.परभणीकर गुरुजी, भगवान शास्त्री धारुरकर, गोपाळ शास्त्री गोरे, एकनाथ महाराज देगलूरकर आदि संत महात्मांच्या मार्गदर्शनाखाली प्राकृत प्रस्थानत्रयी धर्मशास्त्र, स्मृती ग्रंथ पुराण इत्यादी ग्रंथाचा पंढरपूर येथे अभ्यास केला. चार्तुमासामध्ये 60 वर्षांपासून त्यांचे अध्ययन व अध्यापनाचे कार्य चालू आहे.

ʻविठ्ठल कवचʼ, ʻविठ्ठल सहस्त्रणामʼ, ʻविठ्ठल स्तवराजʼ, ʻविठ्ठल अष्टोत्तरनामʼ, ʻविठ्ठल हृदयʼ, ʻमुक्ताबाई चरित्रʼ, ʻज्ञानेश्वर दिग्विजयʼ, ʻवाल्मिकी रामायणʼ, ʻसंत तुकाराम महाराज सदैह वैकुंठ गमनʼ अशा अनेक ग्रंथांचे त्यांनी संपादन केले. ह.भ.प.वक्ते यांची कीर्तन, प्रवचनाव्दारे मानवतावादी सेवा अखंड सुरू असून त्यांच्या मागदर्शनाखाली हजारो साधक शास्त्राचा अभ्यास करुन राष्ट्र जिर्णोद्धाराचे कार्य करत आहेत.

मनुस्मृती हा वारकरी संप्रदायासाठी महत्त्वाचा ग्रंथ आहे. प्रत्येक संताने मनुस्मृतीचाच आधार घेतला आहे. संत तुकाराम महाराजांची गाथा हे मनुस्मृतीवरच आधारलेली आहे. मनुस्मृतीत जे लिहिलं गेलं तेच गाथेतून मांडलं गेलं आहे. भगवंताकडनं मनूला ज्ञान झालं आणि तेच मनूनं मानवाला सांगितलं. पण आपल्याकडे मनुस्मृती लोकांना समजलीच नाही. तिचा अर्थच अनेकांना समजत नाही, असे मत निवृती महाराज वक्ते बाबा यांनी मांडले होते.

समर्थ रामदासांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या व धर्म न मानणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धार्मिक कार्यक्रमांना बोलवू नका, अशी स्पष्ट भूमिका वक्ते बाबांनी घेतली होती.

Published by: sachin Salve
First published: December 21, 2020, 7:52 AM IST
Tags:

ताज्या बातम्या