पुणे, ठाण्यासह अनेक महापालिका क्षेत्रात संचारबंदीचे आदेश लागू

पुणे, ठाण्यासह अनेक महापालिका क्षेत्रात संचारबंदीचे आदेश लागू

संचारबंदीचा आदेश आता अनेक महत्त्वाच्या शहरात लागू करण्यात येत आहे.

  • Share this:

पुणे, 22 नोव्हेंबर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत राज्य सरकारने महापालिका क्षेत्रांमध्ये नाईट कर्फ्यूचा निर्णय घेतला. हा संचारबंदीचा आदेश आता अनेक महत्त्वाच्या शहरात लागू करण्यात येत आहे.

पुणे शहरात आज रात्रीपासून संचारबंदी आदेश लागू करण्यात आले असल्याची माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसंच मालेगाव शहरातही संचारबंदी लागू झालेली आहे. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी नाईट कर्फ्यूबाबत आदेश काढला आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातही संचारबंदी निर्णय लागू झाला आहे.

ठाण्यात संचारबंदीत कसे असतील नियम?

ठाणे पोलीस आयुक्त विवेक फ़णसळकर यांनी संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. आज रात्री पासून ते 5 तारखेपर्यत हे आदेश ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात लागू असतील. या दिवसांमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत केवळ वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी असेल. विनाकारण फेरफटका मारण्यास, सायकल, मोटारसायकल किंवा गाडीने अनावश्यक बाहेर पडल्यास, कलम 188 द्वारे कारवाई केली जाणार आहे.

घराच्या बाहेर, बिल्डिंगच्या गच्चीवर कोठेही रात्री 11 नंतर बाहेर येण्यास कार्यक्रम करण्यास मनाई आहे. तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम घेण्यास, पब, हॉटेल, क्लब, रिसॉर्ट सुरू ठेवण्यास मनाई असेल. ठाणे पोलीस आयुक्तालयात ठाणे, कळवा, मुंब्रा, कल्याण डोंबिवली, भिवंडी शहर, अंबरनाथ बदलापूर, उल्हासनगर असे सर्व महानगरपालिका क्षेत्र येतात.

आदेश जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं होतं?

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात 22 डिसेंबरपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 जानेवारीपर्यंत हा नियम लागू राहील, असे निर्देश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: December 22, 2020, 8:15 PM IST

ताज्या बातम्या