मुंबई, 24 नोव्हेंबर : सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर दावा सांगितल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील ‘सोलापूर आणि अक्कलकोट प्रदेश कर्नाटकचे असल्याचा वक्तव्य बोम्मई यांनी केले. यावर आता नव्याने राजकीय वाद सुरू झाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. सोलापूर आणि अक्कलकोट हा महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे यावर कोणीही दावा करू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे
गोऱ्हे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील कन्नड भाषा बोलणाऱ्या अक्कलकोट, सोलापूर ही शहरे महाराष्ट्रातील गावांचा समावेश कर्नाटक मध्ये करण्याची मागणी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी केली. या त्यांच्या विधानाचा मी निषेध व्यक्त करते आहे. महाराष्ट्रात अक्कलकोट, सोलापूर सारख्या शहरांमध्ये गेल्या शेकडो वर्षांपासून कानडी भाषिक स्थलांतरीत नागरिक राहत आहेत आणि आता हे महाराष्ट्राचे अविभाज्य भाग बनले आहेत.
हे ही वाचा : कर्नाटकचे CM काही शांत बसेना, आता म्हणे, ‘सोलापूर, अक्कलकोट आमचंच!’
न्यायालयात या प्रश्नावर सुरू असलेली चौकशी आता ऐरणीवर आली असताना स्वत:कडील लंगडी बाजू लपविण्यासाठी कर्नाटकने अशा प्रकारे विधाने करण्यास सुरुवात केली आहे. अशी उलट सुलट विधाने करून जनतेची दिशाभूल करणे, अशा प्रकारे केंद्र सरकारच्या कामाची पद्धत असल्याचे दिसून येत आहे.
यामुळे समाजात तेढ वाढवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकार करीत आहे. पाकिस्तान देखील अशा प्रकारे काम करताना दिसत आहे. दररोज एक चौकी काबीज करून हा पाकिस्तानचा भाग आहे, असे म्हणण्यासारखे वक्तव्य हे कर्नाटक सरकार करीत आहे.
याकरिता केंद्राने वेळीच कर्नाटकला चाप लावण्यासाठी पावले उचलण्याची तयारी दाखवावी. तसे होणार नसेल तर महाराष्ट्र देखील याबाबत प्रत्युत्तर देण्यास समर्थ आहे. या प्रश्नावर केंद्र सरकार दोन्ही हातात लोण्याचा गोळा ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. एका बाजूला कर्नाटक सरकारमधील जनतेची मते मिळवायची आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील जनतेला देखील बेळगाव तुम्हाला देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत असे सांगून काहीतरी आश्वासने द्यायची, केंद्राची ही राजनीती सुरू आहे.
हे ही वाचा : ‘शिवसेनेकडून धमकी देतोय…’, संजय राऊतांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भरला दम
काय म्हणाले बोम्मई…
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भूमीबद्दल नवं विधान केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमावादावर केलेल्या विधानानंतर प्रतिक्रिया देताना बोम्मई यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये एक इंचही सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सोलापूर आणि अक्कलकोट हे कन्नड भाषिक भाग कर्नाटकाचे असावेत. ‘महाराष्ट्रातील कन्नड भाषिक भाग कर्नाटकचा आहे’, अशी आमची मागणी आहे, असं बोम्मई यांनी म्हटलं आहे.