मुंबई, 24 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मंत्री झाल्यानंतर आता नवा प्रदेशाध्यक्ष नेमण्यासाठी राष्ट्रवादीत हालचाली सुरू झाल्या आहेत. यंदा राष्ट्रवादीला युवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असून राष्ट्रवादीत या पदासाठी धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड या तीन नेत्यांची नावं चर्चेत आहेत. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतरच याबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप आणि शिवसेनेत निर्माण झालेल्या संघर्षामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाट्यमयरित्या सत्तेत सहभागी झाला. तसंच उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं असलं तरीही या सरकारच्या मंत्रिमंडळाचा चेहरा अद्याप स्पष्ट झालेला नाही. कारण आता पर्यंत केवळ सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार होणं बाकी आहे. मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत अनेक नावं आघाडीवर आहेत. उद्धव ठाकरेंची वाढू शकते डोकेदुखी, शिवसेना-राष्ट्रवादीच्या खात्यांवर काँग्रेसचा डोळा अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह धनंजय मुंडे यांचंही नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर असल्याचं चित्र होतं. मात्र आता धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची नव्हे तर पक्षाकडून संघटनेत मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक असेलल्या धनंजय मुंडे यांच्यावर राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यपदाची जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, आक्रमक नेते अशी ओळख असणारे जितेंद्र आव्हाड आणि कोरेगाव मतदारसंघातून पराभूत झालेले राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे हेदेखील प्रदेशाध्यपदाच्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नक्की कुणाच्या गळ्यात प्रदेशाध्यपदाची माळ टाकतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







