मुंबई, 9 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी भगव्या वस्त्रांवरून वादग्रस्त विधान केलं आहे. भोंदूगिरी करणारे बाबा भगवी वस्त्र धारण करतात, असं विद्या चव्हाण म्हणाल्या आहेत. विद्या चव्हाण यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सुरू असलेल्या जनजागर यात्रेवेळी विद्या चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं आहे. ‘सावित्रीच्या लेकींचा जागर आम्ही सुरू केला आहे. हा जागर महागाई बेरोजगारी संदर्भात आहे. गेल्या 7-8 वर्षांमध्ये मोदींची सत्ता आल्यापासून नुसत्या घोषणा होत आहेत. खाजगीकरणामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पेट्रोल-डिझेल यांनी शंभरी पार केली आहे, यामुळे महागाई वाढली आहे. सगळ्या अन्नपदार्थांवर 5 टक्के जीएसटी लावण्यात आलाय. आपण अकार्यक्षम आहोत हे जनतेला सांगण्यापेक्षा रोज नवीन काही तरी वाद निर्माण करायचा आणि लोकांचं लक्ष विचलित करायचं, हे प्रकार सगळीकडे सुरू आहेत,’ असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला. ‘केंद्र आणि राज्य सरकारने महागाई आणि बेरोजगारीवर बोललं पाहिजे, पण कुणीच काही बोलत नाहीत. कधी भगव्याचे राजकारण केलं जातं, कोणीतरी भगवा धारी येतो, योगी येतात. मी सुद्धा हिंदू आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीला सर्व मंदिरांमध्ये मोठी गर्दी होती, पण कुणी भगवी वस्त्र घातली नव्हती. भगवा हे त्यागाचं प्रतिक आहे, भोगीचं नाही. हे लोक भगवा घालून फिरतात ते चुकीचं आहे,’ अशी टीका विद्या चव्हाण यांनी केली. ‘शिंदे कामाख्या देवीला जातात, पण त्यांना राज्यातील देवी दिसत नाही, कारण तिथे जादूटोणा चालतो. मुख्यमंत्रीच जादूटोणा करत असेल, तर त्यांनाच आधी जेलमध्ये टाकलं पाहिजे. भोंदूगिरी करणारे बाबा भगवी वस्त्र धारण करतात, मुख्यमंत्री भोंदूगिरी करतात, त्यामुळे त्यांचं महागाईकडे लक्ष नाही. 100 कोटींचे आरोप करणारे कमिशनर कुठे गायब झाले? त्यांची साधी चौकशी तरी झाली का?’, असा घणाघात विद्या चव्हाण यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.