ठाणे, 7 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे पुन्हा वादात सापडले आहेत. ठाण्याच्या व्हिव्हियाना मॉलमध्ये जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह आले आणि त्यांनी हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी एका प्रेक्षकालाही मारहाण केली आहे. या प्रेक्षकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. शो बंद केल्यानंतर प्रेक्षकांनी तिकिटाचे पैसे मागितले म्हणून प्रेक्षकाला मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे. नुकातच रिलिज झालेला हर हर महादेव आणि लवकरच येणारा महेश मांजरेकर यांचा वेडात मराठे वीर दौडले सात हे चित्रपट वादात सापडले आहेत. पुण्यामध्ये आज संभाजी ब्रिगेडनेही हर हर महादेवचे शो बंद केले.
राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यात 'हर हर महादेव'चा शो बंद पाडला, कार्यकर्त्यांकडून प्रेक्षकाला मारहाण#NCP #Harharmahadev pic.twitter.com/CxGsP1cM2H
— News18Lokmat (@News18lokmat) November 7, 2022
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? हर हर महादेवचा शो सुरू असताना जितेंद्र आव्हाड अचानक थिएटरमध्ये आले आणि त्यांनी प्रेक्षकांना हा चित्रपट न बघण्याचं आवाहन केलं. ‘इतिहास बदनाम आणि विकृत करण्याची पुरंदरी परंपरा आहे. ब.म पुरंदरेंनी महाराष्ट्रात सुरू केलं ते आता सिनेसृष्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रात पोहोचवण्याचं काम सुरू झालं आणि त्याला आमचा विरोध आहे. आम्हाला तुमच्याशी काहीही घेणं देणं नाही. पण असे विकृत सिनेमे महाराष्ट्रात दाखवायचे नाहीत हे आम्ही जाहिररित्या सांगतो’, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
ठाण्यात 'हर हर महादेव'चा शो बंद पाडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया#HarHarMahadev #JitendraAwhad #NCP pic.twitter.com/ER19BGKUuQ
— News18Lokmat (@News18lokmat) November 7, 2022
थिएटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव अशा घोषणा देण्यात आल्या. याआधी संभाजीराजे छत्रपती यांनीही हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटांनाही विरोध केला होता.